आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मल ग्राम पाटोदा ठरले विकासाचे आदर्श ‘मॉडेल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज-संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल शासनाच्या तब्बल 53 लाख रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले निर्मल ग्राम आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गाव राज्यच नव्हे, तर देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. पाटोदा गावाने स्वच्छता अभियान कार्यक्र मात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून शासनाचे 12 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.

राज्यपाल करणार गौरव : स्वच्छता अभियानात पाटोदा गाव राज्यात प्रथम आल्याबद्दल पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सरपंच दत्तात्रेय शहाणे, ग्रामसेवक आर.डी.चौधरी, माजी सरपंच भास्करराव पेरे यांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मुंबईत एका विशेष कार्यक्रमात उद्या तीन फेब्रुवारी रोजी दिला जाणार आहे.

सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येची पाटोदा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. गंगापूर नेहरीसुद्धा या ग्रामपंचायतीत येते. ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू आहेत. दरवर्षी 100 टक्के कर भरणार्‍या ग्रामस्थांचा ग्रा.पं.तर्फे सत्क ार केला जातो. शिवाय, मुदतपूर्व कर भरणार्‍यांचा विशेष भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीची 100 टक्के करवसुली होते. अशा ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या गिरणीत मोफत दळण दळून दिले जाते. हा उपक्रम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. हा उपक्रमही देशातील

पहिला ठरला आहे.
ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांचा वाढदिवस : विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जन्मतारखांच्या नोंदी ठेवून संबंधितांना वाढदिवसाला ग्रामपंचायतीत बोलावून त्यांचा सत्क ार केला जातो.

गावावर सीसीटीव्हीची नजर : गावाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही ग्रामपंचायतीने गावाच्या चोहोबाजूंनी 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दर चार दिवसांनी रेकॉर्डिंग तपासली जाते.

सांडपाण्यावर वाढवली झाडे : परिसरात पाच वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान आहे. पाणीटंचाईमुळे गावे तहानेने व्याकुळलेली असतानाही पाटोदा गावाने पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेअंतर्गत लावलेली नारळ, चिंच, जांभूळ, आंबा, पेरू ही फळझाडे तर इतर शोभेची झाडे सांडपाण्यावर जगवण्याची किमया शेतीतज्ज्ञांच्या मदतीने साधली गेली.

प्रत्येकाच्या नळाला मीटर : गाव हंडामुक्त करण्याचा विडा ग्रामपंचायतीने उचलला आहे. गावातील कोणत्याही महिलेच्या डोक्यावर पाणी आणण्यासाठी हंडा नको, यासाठी ग्रामपंचायतीकडून घरोघरी एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. औद्योगिक विकास महामंडळ ग्रामपंचायतीला मीटरद्वारे पाणी देते. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतही प्रत्येक नळाला मीटर बसवून मासिक बिल आकारते. ग्रामस्थांना 1 हजार 600 रुपयांचे मीटर मोफत बसवून देण्यात आले आहेत. ग्रामस्थांना मात्र त्यासाठी 1 हजार 900 रुपये अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाऊन हवे तेवढेच पाणी वापरले जाते. सध्या सुमारे 450 नळांना मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

‘इको व्हिलेज स्कीम’च्या अंमलबजावणीतून गावांचा होणारा शाश्वत विकास, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत गावातील विकासकामे, नावीन्यपूर्ण विविध उपक्रम, निकषांतर्गत लावलेली व जगवलेली झाडे, 100 टक्के करवसुली, सांडपाणी व्यवस्थापन, सौरदिवे, बायोगॅस, घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेले प्रयत्न, अमलात आणलेल्या विविध उपाययोजना, दुष्काळामुळे सांडपाण्याच्या व्यवस्थापनातून फुललेल्या बागा, जगवलेली झाडे, गावातील पाण्याचे स्रोत व त्यांचे जतन आणि संवर्धन, ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे व मिळालेले तब्बल 53 लाख रुपयांचे पुरस्कार यामुळे पाटोदा ग्रामपंचायत देशासाठी आदर्श मॉडेल ठरले आहे.

अंगणवाडीत सोलर शिपलर विभाग
येथील ‘आयएसओ’ नामांकन मिळवलेल्या अंगणवाड्यांत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत बनवल्या जाणार्‍या पोषण आहारासाठी स्वयंपाकगृहात ‘सोलर शिपलर’ ही सौर ऊज्रेवर चालणारी शेगडी वापरली जाते. अंगणवाडीत अशी शेगडी बसवणारी ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.

महिलांना समान संधी
येथील ‘महिलांना समान संधी, समान हक्क’ याप्रमाणे घरांवर महिलांचा अधिकार राहावा, यासाठी प्रत्येक घरावर महिलांची नावे टाकण्यात आली आहेत. शिवाय, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर ही सुरू करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कारासाठी पाटोद्याची निवड झाल्याने पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सरपंच दत्तात्रेय शहाणे, ग्रामसेवक आर.डी.चौधरी, भास्करराव पेरे यांचा सत्कार करण्यात आला.