आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Barrier Not Come, There Will Be Samantar Water Available

'कामात अडथळे' आले नाही तर विघ्नहर्त्याबरोबर ‘समांतर’चे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी समांतरच्या कामाची पाहणी करून पाइपमधून उडी घेतली. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद - भूसंपादन झाले आहे, मात्र वाटेत लागणाऱ्या पाच गावांतील गावकऱ्यांनी विरोध केला नाही किंवा अन्य कोणतेही विघ्न आले नाही तर बरोबर १२ महिन्यांत जायकवाडी ते नक्षत्रवाडी अशी ४० किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होऊन पाणी शहरात येऊ शकते, असा विश्वास वाहिन्या टाकण्याची उपनिविदा घेतलेल्या टाटा प्रोजेक्ट कंपनीने केला आहे. बिडकीनजवळील बंगला तांडा येथून त्यांनी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले आहे. औरंगाबाद वॉटर युटिलिटी या कंपनीने टाटा प्रोजेक्टला हे काम करण्यासाठी १८ महिन्यांचा अवधी दिला आहे. मात्र, आम्ही हे काम वेळेआधीच म्हणजे आजपासून १२ महिन्यांत पूर्ण करू, असा दावा या प्रकल्पाचे इन्चार्ज तथा टाटा प्रोजेक्टचे महाव्यवस्थापक एन. एस. एस. राव यांनी केला.

समांतर जलवाहिनीचे पाइप टाकण्यास बंगला तांडा येथे सुरुवात झाल्याचे समजल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, माजी सभापती नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा टाटा प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बिडकीन, इसारवाडी, धनगाव, ढोरकीन, फारोळा आणि चितेगाव अशा पाच गावांतून ही वाहिनी टाकावी लागणार आहे. तेथेच विरोध होऊ शकतो, असा अंदाज आहे. कारण काही घरे पाडावी लागणार आहेत. पोलिस तसेच प्रशासनाचे सहकार्य तेथे कंपनीला अपेक्षित आहे. तेथे विरोध झाला नाही तर एका वर्षात आम्ही आम्हाला दिलेले काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खरेच तसे झाले तर पुढील वर्षी येणारा गणराया हा समांतरच्या पाण्यासोबतच येऊ शकतो किंवा शहरात त्याचे विसर्जन समांतरच्याच पाण्याने होऊ शकेल. त्या पाच गावांतून विरोध होणार नाही यासाठी खबरदारी तर घेतली जाईलच, पण गरज पडल्यास आम्ही कंपनीला मदत करू, असे आश्वासन महापौर तुपे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

पोकलेनच्या मदतीने २० फूट चारी पाडून त्यात पाइप टाकण्यात येत आहेत. जेथे नरम माती असेल तेथे खाली सिमेंट काँक्रिटीकरण केले जाईल आणि जेथे खडक असेल तेथे त्याची लेव्हल करून पाइप टाकले जातील. त्यानंतर पाइप बुजवण्यात येणार आहेत. गती वाढल्यानंतर एका दिवसात एका क्रेनच्या मदतीने दोन पाइप जोडले जातील. पुढे हे काम रात्रंदिवस चालणार आहे. जेथे पिके नाहीत तिथे कोणताही अडथळा नाही, अशा ठिकाणी सध्या पाइप जोडले जातील. काही ठिकाणी वेळप्रसंगी शेतकऱ्यांना मोबदला देऊन उभ्या पिकांतही काम सुरू ठेवले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. जायकवाडीपासून नक्षत्रवाडी येथील उपसा केंद्रापर्यंत पाणी आणून सोडण्याचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट या कंपनीला देण्यात आले असून ते जोमाने कामाला लागल्याचे दिसते. तोपर्यंत समांतरची मूळ ठेकेदार कंपनी नक्षत्रवाडी येथे नवे उपसा केंद्र उभारू शकते अन् समजा त्यांनी ते उभारले नाही, तर जुन्या वाहिन्यांतून पाणी शहराला दिले जाऊ शकते.

ढोरकीन उपसा केंद्राची गरज नाही : नव्यातंत्रज्ञानामुळे ढोरकीन येथे उपसा केंद्र करण्याची गरज नाही. सध्याच्या योजनेत ढोरकीन येथे उपसा केंद्र आहे. मात्र, यापुढे त्याची गरज लागणार नाही. जायकवाडीतील पाणी थेट फारोळा किंवा नक्षत्रवाडी येथील शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकेल. तेथून मात्र पुन्हा उपसा करावा लागेल. जायकवाडी येथे पहिल्या टप्प्यात ७५० एचपीचे पंप लावले जाणार आहेत. त्यानंतर पाण्याची गरज जशी वाढेल तसे पंप वाढवावे लागतील.

असे आहे चित्र
>४०किलोमीटरवाहिनीची लांबी
>३५००सुमारेलागणारे पाइप
>१२फूटपाइपची लांबी
>०८फूटरुंदी (आकार)(यातून उभा माणूस सहजासहजी जाऊ शकतो)
>१०टनपाइपचे वजन
>४००एमएलडीदिवसाला पाणी वहन क्षमता. आताच्या वाहिन्यांच्या क्षमतेच्या अडीचपटीपेक्षाही जास्त)