औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (२० जून) शहरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून याची पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. एमजीएमच्या मैदानावर होणाऱ्या या इफ्तार पार्टीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
याच्या नियोजनासाठी शनिवारी राष्ट्रवादी भवनात शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस संयोजक अब्दुल कदीर मौलाना, माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेराय, प्रदेश प्रवक्ते सुरजितसिंग खुंगर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नीलेश राऊत, अनुसूचित जाती-जमाती सेलचे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, सोपान खोसे पाटील, प्रा. माणिक शिंदे, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक देशमुख, शैलेश चौधरी, राजेश पवार, कैसर खान, महिला शहराध्यक्ष मेहराज पटेल आदी उपस्थित होते. या इफ्तार पार्टीसाठी मराठवाड्यातून मुस्लिम बांधव येणार असल्याचे मौलाना यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे ही इफ्तार पार्टी शक्तिप्रदर्शनासाठी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला असता पक्षाला इफ्तार पार्टीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, हा पक्ष सर्व समाजाचा आहे आणि सर्व समाजांनी एकत्रितपणे सर्वांचे सण साजरे करणे हा त्यामागील उद्देश असल्याचे मौलाना यांनी सांगितले.