आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयआयएम @ औरंगाबाद' - ‘आयआयएम’साठी आता विद्यार्थ्यांचाही रेटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादलाच व्हावे या मागणीसाठी आता विद्यार्थीही मैदानात उतरले आहेत. सीएमआयने आयोजित केलेल्या ‘आयआयएम @ औरंगाबाद’ या मोहिमेत ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. रिमझिम पावसातही त्यांनी आयआयएम औरंगाबादला झालेच पाहिजे, असा नारा दिला. मंगळवारी
एन-2 येथील मैदानात विद्यार्थी आणि उद्योजकांनी मानवी साखळी करत ‘आयआयएम’ची
मागणी रेटली.

आयआयएम औरंगाबादला होण्यासाठी उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, मसिआ, मँग्रो ग्रोव्हर असोसिएशन, वाळूज इंडस्ट्रियल असोसिएशन, मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेडर अँड कॉमर्स, औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर असोसिएशनसह अनेक संघटना यात सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला मुकुंद कुलकर्णी यांनी औरंगाबादला ही संस्था होणे का गरजेचे आहे, याविषयी मत मांडले.

घोषणांनी मैदान दुमदुमले
एन-2 येथील मैदानात आयआयएमच्या मागणीसाठी झेंडे लावून राज्याचा नकाशा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये नकाशातील औरंगाबादच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी साखळी तयार केली होती. ‘आयआयएम औरंगाबादमध्ये झालेच पाहिजे’ अशी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. 300 पेक्षा आधिक विद्यार्थी या मानवी साखळीत सहभागी झाले होते.

दान नको, हक्काचे द्या
या वेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, आयआयएमचे दान नको तर तो आमचा हक्क आहे. त्यामुळे आम्हाला हक्क द्या. आज डीएमआयसीच्या माध्यमातून 9000 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग शहरात येणार आहेत. डीएमआयसीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी तयार करण्यात येणार आहे.
त्यामुळे अशा वेळी आयआयएम आल्यास त्याचा फायदा होईल. त्यामुळे ही संस्था इतरत्र जाण्यापूर्वी ती औरंगाबादमध्येच यावी यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही
दर्डा यांनी दिली.

टू टायर सिटी हेच उद्याचे भविष्य
सीएमआयचे अध्यक्ष मुनीश शर्मा यांनी सांगितले की, टू टायर सिटी हे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नाही म्हणत असले तरी शहरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. 7 आॅगस्टला सीएमआयच्या वतीने दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे. तसेच मराठवाड्यातल्या खासदारांना याबाबत पत्रे लिहिण्यात आली आहेत.
शहराची वेगळी ओळख होईल
- ही संस्था शहरात आल्यास शहराची वेगळी ओळख निर्माण होईल. जगभर शहराचे नाव जाईल. इंटरनॅशनल कोर्सेस शहरात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच स्थानिक उद्योजकांनाही रिसर्च कार्यक्रम घेण्यासाठी फायदा होणार आहे. प्रशांत देशपांडे, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय

डीएमआयसीमुळे फायदा होईल
- शहराच्या विकासासाठी आयआयएम येणे गरजेचे आहे. मराठवाड्यात 400 महाविद्यालये आहेत. औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. ही संस्था आल्यास विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. तसेच डीएमआयसीसाठीही त्याचा फायदा होईल.
भारत मोतिंगे, अध्यक्ष, मसिआ

मराठवाडा पिछाडीवर
- नागपूर-पुण्याला न्याय मिळाला आहे. त्या तुलनेत मराठवाडा पिछाडीवर राहिला आहे. ही संस्था आल्यास शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. शहरात या संस्थेसाठी क्षमता आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाला फायदा होईल. मुकुंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष, मसिआ