आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटीआय पास तरुणाने बनवले स्पेशल पर्पज यंत्र, व्होल्व्हो, सुट्या भागाचे उत्पादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुर्गम आदिवासी पाड्यावर राहून कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे आयटीआय केले आणि नाशिकला एका कंपनीत नोकरी धरली. सर्व्हिस इंजिनिअरच्या हाताखाली हेल्पर म्हणून आला आणि वेगळ्या वेळेत बड्या कंपन्यांतील यंत्रांची बारीकसारीक माहिती करून घेतली. स्वत:चा उद्योग उभारण्याचा ध्यास स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर धाडस केले आणि औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतील छोट्याशा गाळ्यात उद्याेग सुरू झाला. चिकाटीने तो वाढवतानाच अनुभवाच्या बळावर आज बीएमडब्ल्यू व व्होल्व्हो वाहनासाठी लागणारा एक महत्त्वाचा सुटा भाग तयार करणारे मशीन तयार केले. नंदुरबार येथील मिलिंद घोडके या तरुणाच्या यशस्वी वाटचालीची ही गाथा आहे.

आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या मिलिंद घोडके यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. दहावीनंतर त्यांनी आयटीआय केले. नोकरीच्या शोधात नाशिक गाठले. तेथे नॅच या बहुराष्ट्रीय कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी लागली. सात वर्षे काम केले. पुढे १९९६ मध्ये कंपनीने औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीत सर्व्हिस इंजिनिअरच्या हाताखाली हेल्पर म्हणून पाठवले. दुपारपर्यंत काम केल्यानंतर लाइन बंद व्हायची. मग मिलिंद यांचे शिक्षण सुरू व्हायचे. कंपन्यांतील यंत्रांचे बारकावे माहिती करून घेण्याचा सपाटा त्यांनी लावला. आॅटोमेशनमध्ये आधीपासूनच रूची होती, ही नवनवी माहिती मिळू लागल्यावर स्वारस्य आणखी वाढले. पुढे २००६ मध्ये नॅच कंपनीतील दहा वर्षांची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय उभारणीच्या इराद्याने मिलिंद यांनी दिंडे उद्योग वसाहतीत ६०० चौरस फुटाचा गाळा घेतला. संशोधन आणि विकास असे कामाचे स्वरूप होते. कंपन्यांचे विशेष भाग विकसित करून देण्याच्या आॅर्डर मिलिंद यांच्या आदिनाथ एंटरप्रायझेसला मिळू लागल्या. दहा वर्षांत आज स्पेशल पर्पज मशिन तयार करण्यापर्यंत मजल मिलिंद यांनी मारली.

लॉटरी विकली, ऑम्लेटचा गाडा चालवला..
मिलिंद यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. आई सुनंदा व वडील नथ्थू घोडके हे शिवणकाम करत असत. त्यांना हातभार म्हणून मिलिंद यांनी दहावीपर्यंत लाॅटरी विकण्याचे काम केले. नाशिकला गेल्यावर आम्लेटच्या गाडीवरही काम केले. पुढे उद्योगात उडी घेतल्यावर धाकटा भाऊ योगेश यालाही तंत्रज्ञ बनवले. स्वत:च्या युनिटच्या बाजूलाच एक छोटा कारखाना काढून दिला. दहावीपर्यंत शिकलेला योगेशही चार वर्षांपासून आॅटोपार्ट तयार करत आहे.
स्पेशल पर्पज मशीन हे बी.ई. इंजिनिअरचे काम
वाहनाचा महत्त्वाचा पार्ट तयार करणारे मशीन विकसित करण्याचे काम मिलिंद घोडके करतात. खरे तर बी.ई. किंवा एम.ई. झालेल्या इंजिनिअरच्या दर्जाचे हे काम आहे. परंतु साधे आयटीआय झालेले मिलिंद ते करतात. नॅच कंपनीत राहून अनुभवाच्या बळावरच ते उत्तम तंत्रज्ञ झाले. रोबोटिक तंत्रज्ञान त्यांनी शिकून घेतले होते.
त्याच आधारावर हे स्पेशल पर्पज मशिन ते करतात. कोणताही अवघड जाॅब आणला तरी मिलिंद त्या पार्टचे उत्पादन करणारे मशिन तयार करून देतात.
बजाज ते बीएमडल्ब्यू, व्हाल्व्होचा प्रवास...
सुरुवातीला मिलिंद यांनी एका मित्रासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. पुढे तो त्यांचा स्वत:चा झाला. छोट्या कारखान्यांतून अाॅर्डर मिळवण्यासाठी ते उद्योजकांकडे जात असत. रोबोटिक तंत्रज्ञानावरचे मिलिंद यांचे प्रभुत्व पाहून देशभरातील बड्या कंपन्यांकडून त्यांना स्पेशल पर्पज मशिनच्या आॅर्डर मिळत आहेत. दिल्लीच्या व्होल्व्हो आयशर कमर्शीयल व्हेईकल ग्रुपच्या(व्ही. ई.कमर्शियल ग्रुप) वतीने बीएमडब्ल्यु व व्होल्व्हो च्या इंजिनमध्ये असणाऱ्या फ्लेक्स प्लेट तयार करणारे स्पेशल पर्पज मशिन तयार करण्याचे काम त्यांना मिळाले आहे.

चीनची ऑर्डर थांबवली...
औरंगाबादेतील एक बडा उद्योग चीनहून दुचाकीच्या शाॅकअपचे राॅड मागवत होता. महिन्याला १ लाख पीस यायचे. हा पार्ट तयार करणारे मशिन विकसित करण्याचे आव्हान मिलिंद यांनी स्वीकारले. यामुळे चीनची आॅर्डर थांबवली गेली. बजाज, एन्डयुरन्स, महिंद्रा, होन्डा मोटर्स, ऋचा इंजिनिअरिंग, प्रिमियर इंजिनिअरिंगसह लुधियाना, प्रीतमपूर, पंतनगर एमआयडीसीतही मिलिंद यांची कामे आहेत. सध्या ते होंडाच्या नव्या दुचाकीचा एक भाग तो विकसित करून देत आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...