आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूमोनिया, लेप्टोसह विषाणू तापाने औरंगाबाद शहर फणफणले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरभर विषाणुजन्य (व्हायरल) आजारांचे रुग्ण दिसून येत असून सर्वच रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागामध्ये (ओपीडी) सुमारे 25 टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: डेंग्यू व डेंग्यूसदृश रुग्णांसह लेप्टोस्पायरोसिस, न्यूमोनिया, कावीळ, गॅस्ट्रो, दमा, विविध श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. बच्चे कंपनीसह मोठी मंडळीही सर्दी, खोकला व तापाने फणफणली आहेत. त्याचबरोबर घाटीतील श्वानदंशासह सर्पदंशाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

घाटीत दररोज चार-पाच गॅस्ट्रोचे रुग्ण येत आहेत. घाटीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेतून शहर व शहरालगतच्या 14 जणांना डेंग्यू असल्याचा अहवाल देण्यात आला आहे, तर यातील काही जणांवर घाटीमध्ये उपचारही करण्यात आले. जुलै महिन्यामध्ये सुमारे 330 श्वानदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील बहुतांश रुग्ण हे शहर व आसपासच्या गावातील आहेत. त्याचप्रमाणे सर्पदंशाचे रुग्णही लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यामध्ये 130 सर्पदंशाच्या रुग्णांवर घाटीमध्ये उपचार करण्यात आले असून यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. दररोज सर्पदंशाचे चार-पाच रुग्ण, तर श्वानदंशाचे सात ते दहा रुग्ण घाटीमध्ये उपचारासाठी येत आहेत. सद्य:स्थितीत अँटी स्नेक व्हिनोम (एएसव्ही), अँटी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही), अँटी रेबीज सिरम (एआरएस) आदी औषधांचा पुरवठा पुरेसा आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला ‘एएसव्ही’ची पुढील मागणीही कळवण्यात आली आहे, अशी माहिती घाटीचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांनी दिली.

गेल्या आठवड्यात डेंग्यू पॉझिटिव्हचे दोन-तीन रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूसदृश रुग्णांची संख्याही वाढल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी सांगितले. वाळूज भागातून डेंग्यूचे रुग्ण येत असून गॅस्ट्रो, ब्राँकोलायटिसचे रुग्ण निश्चितपणे वाढल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जाधव म्हणाले.

लेप्टोमुळे ‘मल्टिऑर्गन फेल्युअर’
मोठय़ांमध्ये डेंग्यू व डेंग्यूसदृश रुग्णांबरोबरच लेप्टोस्पायरोसिसचे रुग्णही दिसून येत आहेत. मात्र, मागच्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू व लेप्टोचे प्रमाण सध्या तरी कमीच आहे. कदाचित पाऊस उघडल्यानंतरच्या पंधरा दिवसांत या प्रकारचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. डेंग्यू तसेच लेप्टोमुळे विविध अवयव निकामी (मल्टिऑर्गन फेल्युअर) होण्याबरोबरच तीव्र स्वरूपाची गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशा केसेस काही दिवसांत दिसून आल्या आहेत. त्यासाठीच डासांपासून बचाव करणे तसेच घाण पाणी-दलदल-चिखलाचा त्वचेशी संपर्क येऊ न देणे, सर्वांगीण स्वच्छता पाळणे आवश्यक आहे, असे मत वरिष्ठ चिकित्सक डॉ. विवेक तडवळकर यांनी नोंदवले. सध्या ओपीडीमध्ये व्हायरलचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्याबरोबरच काही प्रमाणात श्वानदंशासह सर्पदंशाचे रुग्णही दिसून येत आहेत, असे डॉ. समीध पटेल यांनी सांगितले.