आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाग्राम अनधिकृत असल्याने चार कोटींचा चुराडा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) मदतीने महापालिकेने शहरात उभारलेले भव्य कलाग्राम अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. गरवारे क्रीडा संकुलाशेजारी उभ्या ठाकलेल्या कलाग्रामची जागाच महापालिका किंवा एमटीडीसीची नसून, ती एमआयडीसीची आहे. कलाग्रामच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे 4 कोटी रुपये उपयोगात आले आहेत. विशेष म्हणजे प्रकल्प आराखड्याला मान्यता नसतानाच घाईघाईने कलाग्रामचे उद्घाटन उरकण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालकुमार, मनपा आयुक्त पुरुषोत्तम भापकर व एमटीडीसीचे व्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांना याबाबत माहिती होती, तरीही हे कलाग्राम उभे झाले, हे विशेष.
जागेचा ठराव झाला...करारनामा नाही
7 ऑ क्टोबर 1983 रोजी औरंगाबादच्या तत्कालीन मनपा आयुक्तांनी चिकलठाणा एमआयडीसीतील खुली जागा (ओपन स्पेस) क्रमांक 1 व 2ची मागणी केली. गार्डन आणि मैदान विकसित
करण्यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती. एमआयडीसीने खुली जागा क्रमांक 1 आणि 2 नुसार अनुक्रमे 53057 चौ.मी. आणि 1,11, 980 चौ.मी. जागेचा ताबा मनपाकडे दिला. ही जागा एमआयडीसीने नाममात्र दराने देण्याचे ठरवले. याबाबत मनपा आणि एमआयडीसी यांच्यात फक्त ठराव झाला. अद्याप या जागेचा करारनामा झालेला नाही. ठराव आणि करारनामा यातील फरक किमान मनपाच्या अधिका-यांना सांगण्याची गरज नाही. ठराव होताच मनपाने जागेवर ताबा मिळवला. करारनामा करण्यास अधिकारी विसरले. इतकेच नव्हेतर या जागेचे इतक्या वर्षांचे भाडे सुद्धा मनपाने अद्याप एमआयडीसीला दिलेले नाही. करारनामाच न झाल्यामुळे ही जागा आजही एमआयडीसीचीच आहे. मात्र, मनपाच्या अधिका-यांनी फुशारकीने ही जागा आपलीच आहे, अशा तो-या त कलाग्रामला परवानगी दिली.

एमआयडीसीचा पाठपुरावा..
मनपाने एमआयडीसीच्या 1, 11, 980 चौ.मी. क्षेत्रापैकी 27262 चौ.मी. इतकी जागा एमटीडीसीला कलाग्राम प्रकल्पासाठी दिली. एमआयडीसीने या जागेचा करारानामा करण्यासाठी आणि 10 टक्के दराने सदर जागेचे 1, 47, 81, 360 रुपये इतके मुल्य मनपा आयुक्त आणि एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करून कळवले. अशा परिस्थितीत या भुखंडावर झालेले बांधकाम अनाधिकृत असल्याचे एमआयडीसीने 11 जून 2011 च्या पत्रात नमूद करून स्पष्ट केले. शिवाय चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ नियोजन प्राधिकरण असल्याने सदर भुखंडावरील बांधकामाचे नकाशे महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार मंजूर करून घ्यावेत आणि बांधकाम पुर्णत्वाचा दाखलाही घ्यावा, असे एमआयडीसीने मनपा आणि एमटीडीसीला लेखी कळवले. एमआयडीसीच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही आजपावेतो या जागेचा करारनामा झालेला नाही आणि ठरावात ठरलेली मुल्याची रक्कमही मनपा किंवा एमटीडीसीने दिलेली नाही.

अनाधिकृत बांधकाम आणि उद्घाटनाची घाई
जागा एकाची, परवानगी दुस-या ची आणि प्रकल्प तिस-या च...अशा विलक्षण गुंतागुंतीत कलाग्राम सापडले. अशी परिस्थिती असताना एमटीडीसीने केंद्र शासनाचा 4 कोटी रुपयांचा निधी अनाधिकृत जागेवर गुंतवूण बांधकामाची घाई केली. संबंधित जागेचा एमआयडीसीसोबत करारनामा झाला नसताना मनपाने सदर जागेचे मुल्य भरलेले नसताना या जागेवर बांधकामाची आणि उद्घाटन करण्याची घाई संबंधिक विभागाच्या वरिष्ठ अधिका-या ंकडून करण्यात आली. केंद्र शासनाचे 4 कोटी रुपये परत जाऊ नये, म्हणून ही घाई करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाच्या कर्मचा-या ंनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अखेर 23 जुलै 2011 रोजी (अनाधिकृत असलेल्या) कलाग्रामचे केंद्रीय पयर्टन सुबोधकांत सहाय यांच्या हस्ते कलाग्रामचे उद्घाटन उरकण्यात आले. या कलाग्रामचे अद्याप बिल्डिंक कम्पलिशन सर्टिफिकेटही (बीसीसी) झालेले नाही.

कोट
मुख्यालयाशी बोला
मी येथे मुख्यालयाच्या आदेशानुसार काम करतो. हे प्रादेशिक कार्यालय आहे. संबंधीत विषयासंबंधी आपण मुख्यालयाशी बोलावे. मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही.
चंद्रशेखर जैस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एमटीडीसी.

मनपाकडून माहिती घेतो
संबंधीत प्रकरणाबद्दल मी मनपा आणि आमच्या कार्यालयातून माहिती घेतो. यापेक्षा अधिक मी या विषयावर बोलू शकत नाही.किसनराव लवांडे, प्रभारी जिल्हाधिकारी.