आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगच्या जागेवर कब्जा, बांधकाम करून केले अतिक्रमण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अदालत रोडवरील नगरभूमापन क्र. १८०३६ या जागेचे मूळ मालक डॉ. जीवन करजगावकर आणि इतरांनी त्यांची जागा श्री. जेथलिया बिल्डर्स यांना सन १९९० ते ९२ च्या दरम्यान विकसित करण्यासाठी दिली होती. बिल्डरांनी महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन बांधकाम केले. यात इमारतीमध्ये राहणाऱ्या दुकानदार, कार्यालयांसाठी इमारतीच्या दक्षिण बाजूने म्हणजेच इमारतीच्या पाठीमागे वाहनतळासाठी जागा आरक्षित करण्यात आली. तसेच इमारतीच्या चारही बाजूने साइड मार्जिन सोडली. या इमारतीमध्ये चार्टंर्ड अकाऊंटंट, तसेच विविध कार्यालये, कोचींग क्लासेस, दुकाने आणि बँक आदी कार्यरत आहेत.
वाहनतळासाठी आरक्षित ठेवलेल्या एका जागेवर एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने कब्जा केला. आधी त्यांनी मुरुमाचा भराव टाकून जागेचे सपाटीकरण केले. नंतर वाहनतळाचे प्रवेशद्वार पाडून कायमस्वरूपी सुरक्षाभिंत बांधत आणि साइड मार्जीनच्या जागेवर अंडरग्राउंड बांधकाम सुरू केले. या विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या. मनपाने फक्त नोटिसांचा सोपस्कार पार पाडला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने अतिक्रमणधारकाचा दावा फेटाळला. पण तरीही अजून त्यांचे अतिक्रमण पाडण्याची कारवाई झाली नाही.

खरेदी खतातही उल्लेख
येथील खरेदी दाराच्या खरेदीखतामध्ये वाहनतळाची जागा ही इमारतीच्या दक्षिण बाजूने दाखविलेली आहे. तसेच साइड मार्जिंन देखील सर्व बाजूने सोडल्याचेही नमूद आहे. याचबरोबर इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वाहनतळ आणि साइड मार्जिनच्या जागेचा महापालिका नगररचना विभागाने दिलेल्या अंतिम मंजूर रेखांकनात उल्लेखही आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये कमलनयन बजाज हॉस्पिटल कार्यरत होते. ते नव्या जागेत स्थलांतरित झाल्यानंतर ही जागा काही वर्ष रिकामी राहिली. ही जागा देवगिरी बँकेकडे गहाण होती. मूळ मालकाने देवगिरी बँकेचे कर्ज फेडल्यामुळे या इमारतीचा लिलाव हाेवून ही इमारत निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. गाेविंद फुलचंद राजपुत (सिल्लोड) यांनी देवगिरी बॅकेकडून खरेदी केली. डॉ. राजपूत हे या जागेचे मालक झाल्यापासून त्यांनी महापालिकेची परवानगी घेता इमारतीच्या साइड मार्जिनमध्ये वाहनतळाच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू केले. आरसीसी भिंत बांधून वाहनतळाच्या जागेवर जाण्याचा लाेकांचा मार्ग बंद केला. परिणामी वर्षानुवर्ष वापरात असलेले वाहनतळ अचानक बंद झाल्याने कामानिमित्त येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट जालना रस्त्यावर लागून वाहतुकीची कोंडी होत आहे. शिवाय गेल्या चार वर्षापासून ग्राहक, व्यापारी आणि अधिकाऱ्यांना पोलिसांचा जाच सहन करावा लागत आहे.

अतिक्रमणाविषयी तक्रारी
सध्या संबंधिताने दक्षिणेकडील बाजूस पूर्वेकडील बाजूस साइड मार्जिनच्या जागेवर कॉलम घेऊन स्लॅब भरत परदीचे बांधकाम केलेले आहे. तर, इमारतीसमोर प्रसाधनगृहाचे बांधकाम केले आहे. वाहनतळाच्या जागेचे लोखंडी गेट तोडून तेथे आरसीसी सुरक्षाभिंत बांधून बंद केले आहे. याबाबत इमारतीतील रहिवाशांनी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. गेल्या चार वर्षापासून त्यांचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. पण त्यांना कुणीही दाद देत नाहीए.

हायकोर्टातही दावा फेटाळला
असंख्यतक्रारीनंतर अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त शिवाजी झनझन यांच्या आदेशाने तत्कालीन प्रशासकीय अधिकारी प्रियंका केसरकर, नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख, इमारत निरीक्षक सारंग विधाते यांनी मार्च २०१३ रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी वाहनतळाच्या जागेवर विनापरवाना संबंधिताने दक्षिण पूर्वेकडील बाजूस सामासिक अंतरात कॉलम घेऊन स्लॅब भरलेला असल्याचे निदर्शनास आले. सर्वासमक्ष त्या अवैध बांधकामाचा पंचनामा करून ते काम बंद पाडण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इमारत निरीक्षक सारंग विधाते यांनी डॉ. राजपूत यांना यापुढे बांधकाम करण्याची तंबी देऊन नोटीसही बजावली. या नोटीसचा आधार घेत डॉ. राजपूत यांनी मनपा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा जैसे थे आदेश असतानाही पुन्हा इमारतीसमोर प्रसाधनगृहाचे बांधकाम केले. तसेच वाहनतळाच्या जागेत मुरूमाचे ढिगार टाकून सपाटीकरण केले. यांनतर मनपा न्यायालयाने अतिक्रमणधारक डॉ. राजपूत यांचा दावाही फेटाळला. डॉ. राजपूत यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. तेथेही त्यांचा दावा फेटाळण्यात आला. त्यांनतही डॉ. राजपूत यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली मात्र तारखेच्या दिवशीच गैरहजर राहणाऱ्या डॉ. राजपूत यांचा दावा उच्च न्यायालयातही फेटाळण्यात आला.

काय म्हणतात तक्रारदार
न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतरही पार्किंगच्या जागेवर डॉ. राजपूत यांनी बांधकाम केले. या प्रकरणी आम्ही मनपा पोलिसांना वारंवार तक्रारी केल्या. संंबंधिताने वाहनतळाच्या जागेवर भिंत बांधून जाण्याचा मार्ग बंद केला आहे. साइड मार्जिनमध्येही कॉलम उभे केले आहेत.
लक्ष्मीनारायनअट्टल, जे.के. टॉवर्स ऑनर्स असोसिएशन

मंजूर नकाशावर वाहनतळ
डॉ.राजपूत यांनी जुलै २०१३ रोजी वाहनतळाच्या जागेवर सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यासाठी आर्किटेक्ट एस. एम. घाटगे यांच्यामार्फत बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, अर्जासोबत नगरभूमापनक क्रमांक १८०३३६ १८०३५ ची आखीव पत्रिका तसेच टोच नकाशा सादर करणे आवश्यक होते. मनपाच्या नगररचना विभागाने १६ जून १९९४ रोजी मंजूर केलेल्या नकाशाची पडताळणी केली असता संबंधित जागा ही वाहनतळासाठी सोडण्यात आलेल्या कारणाने बांधकाम परवानगी नाकारण्यात आली होती.
काय म्हणतात अतिक्रमणधारक
देवगिरी बॅकेने केलेल्या लिलावात मी ही जागा विकत घेतली आहे. शिवाय मोकळ्या जागेवर माझा मालकी हक्क आहे. काही लोकांनी वाहनतळाच्या जागेच्या वापराबाबत वैयक्तिक वाद केला आणि हे प्रकरण त्यांनीच इमारतीतील लोकांना हाताशी धरून उकरून काढले. माझे बांधकाम रितसर आहे. न्यायालयानेे जागेवरील मालकीहक्काचे पुरावे तपासले नाहीत. महानगरपालिकेच्या न्यायालयात पुन्हा एकदा विचार करण्याबाबत अर्ज पाठवणार आहे. तक्रादारांनी केलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. डॉ.गोविंद राजपुत, निवृत्तवैद्यकीय अधिकारी
बातम्या आणखी आहेत...