आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Construction In Aurangabad News In Marathi

पाणीबाणी: बांधकामांवर बंदी, उद्योगांची पाणीकपात; आजपासून लागू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जुलै महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन औरंगाबाद महापालिका हद्द वगळता तालुक्यातील सर्व बांधकामे बुधवारपासून तातडीने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी मंगळवारी जारी केला. याचा फटका 40 हजारांवर मजुरांना बसणार आहे.

दुसरीकडे जायकवाडी धरणातील पाणी उपसा कमी करण्यासाठी उद्योगांचा पाणीपुरवठाही 15 ते 20 टक्के कमी करण्याची सक्ती केल्याने उद्योग क्षेत्रावरही संकट उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आणि शहराला वर्षभर पुरेल इतके पाणी जायकवाडीत पोहोचले तरच हा आदेश मागे घेतला जाणार आहे.

औरंगाबादला पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात 15 जुलैपर्यंत किमान दहा टक्के वाढ अपेक्षित होती. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे त्यात वाढ होण्याऐवजी घट होत गेली. जायकवाडीत सध्या अवघे दोन टक्के पाणी आहे. हे पाणी बांधकामाला वापरले जात असल्याची शंका प्रशासनाला आहे. हे पाणी संपले तर शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता गृहीत धरून कमी पाणी वापराबरोबरच अन्य जलस्रोत कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बांधकामासाठी होणारा पाण्याचा उपसा थांबला तर भूगर्भातील पाणी आणखी काही दिवस वापरणे शक्य होईल, असाही प्रशासनाचा होरा आहे.

चाळीस हजारांवर कामगारांना फटका
1. मनपा हद्दीलगत सातारा-देवळाई, गांधेली, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, करमाड येथे सर्वाधिक बांधकामे सुरू आहेत.
2. क्रेडाई तसेच खासगी मिळून सद्य:स्थितीत अडीच हजारांवर बांधकामे प्रगतिपथावर.
3. बांधकामावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 40 हजार कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून.
4. बंदीचा फटका वीट, वाळू, खडी, क्रशर, टँकरवर काम करणार्‍यांनाही बसेल.
5. दोन हजारांवर टँकरची चाकेही थांबू शकतात. त्यांना पिण्याच्या पाणीपुरवठ्याकडे वळावे लागेल.

पुढे काय?
जोरदार पाऊस झाल्याशिवाय जिल्हाधिकारी विद्यमान आदेश मागे घेणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे वरुणराजावरच सर्व मदार आहे. 40 हजार मजुरांना अन्यत्र म्हणजेच मनरेगावर काम द्यावे लागेल, तशी तयारी असल्याचेही विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

महसूलची पथके सक्तीने करणार निर्णयाची अंमलबजावणी

>विवंचना वाढली
औरंगाबाद परिसरातील बांधकामांमध्ये सुमारे 4 हजार कोटींची गुंतवणूक आहे. बांधकाम बंदीचा कालावधी वर्षभरापर्यंत वाढला तर किमतीत मोठी वाढ होईल. परंतु खरेदीदार कमी होण्याची भीती.

>तहसीलदारांचे लक्ष
बांधकामे सक्तीने थांबवली जाणार.त्यासाठी बुधवारी सकाळपासून तहसीलदार विजय राऊत तसेच गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी जागोजागी फिरून बांधकामे सक्तीने बंद करणार आहेत.
>100 उद्योगांना झळ
पाणीकपातीचा वाळूज, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सुमारे 100 उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये औषधी, रसायने, शीतपेये, बिअर उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

>एमआयडीसीही सज्ज
जायकवाडीतून उद्योगांना दररोज 35 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यातून कपातीचे नियोजन आठवडाभरात करू, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नवाळे यांनी सांगितले.

> जायकवाडीत पाणी असले तर निम्म्या जिल्ह्याची तहान भागवता येते. मात्र तेथेच पाणी नसेल तर पाणी मिळणार नाही. त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला. बांधकामे सुरू राहिल्यास कठोर कारवाई करू.
- विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.

>बांधकाम बंदीचा आदेश अजून मिळाला नसला तरी अपेक्षित होता. काम बंद करण्याशिवाय आमच्यापुढेही पर्याय नाही.आता आमच्या नफ्या-तोट्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात अर्थच नाही.
- पापालाल गोयल, अध्यक्ष, क्रेडाई.