आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी न करणार्‍या मंडळांवर कारवाई; पोलिस आयुक्तांचा सज्जड दम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी करण्याची गरज असून नोंदणी न करणार्‍या मंडळांवर मुंबई पोलिस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील दहा मुख्य ठिकाणी पोलिस मदत केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवात शहरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, 34 पोलिस निरीक्षक, 97 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 2 हजार 722 पोलिस कर्मचारी, 262 महिला पोलिस कर्मचारी, पाच स्ट्रायकिंग फोर्स याशिवाय 276 पुरुष होमगार्ड आणि 82 महिला होमगार्ड, एक राज्य राखीव दलाची तुकडी, राजस्थानहून आलेली केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी तसेच बाहेरील अतिरिक्त 25 पोलिस उपनिरीक्षक व सध्या प्रशिक्षण घेत असलेले 251 महिला व पुरुष कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

शहरातील सर्व गणेश मंडळांना सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या, असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावरही सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गतवर्षी 1301 गणेश मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली होती. मात्र, यंदा 1163 मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केली असून उर्वरित मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी करावी. नोंदणी न करणार्‍या मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्तांनी भरला.

10 ठिकाणी पोलिसांची मदत केंद्रे स्थापन
शहरातील दहा ठिकाणी पोलिसांची मदत केंद्रे स्थापण्यात आली असून या मदत केंद्रांवर दिवस आणि रात्रपाळीत आठ-आठ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. निराला बाजार, क्रांती चौक, गांधी पुतळा शहागंज, पदमपुरा चौक, कामगार चौक, गुलमंडी, गजानन महाराज मंदिर, कॅनॉट प्लेस, सेंट्रल नाका आणि शहानूरमियाँ दर्गा रोड येथे ही केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

शहराबाहेर सहा ठिकाणी लागणार चेक पोस्ट
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील, परंतु शहराबाहेरील हसरूल नाका, जालना नाका, पैठण नाका, बीड नाका, दौलताबाद नाका आणि वाळूज नाका या सहा ठिकाणी पोलिसांचे चेक पोस्ट असून शहरात येणार्‍या प्रत्येक संशयित वाहनाची पोलिस कसून तपासणी करणार आहेत.

साडेचारशे विद्यार्थ्यांना स्वयंसेवकाचे प्रशिक्षण
प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत साडेचारशे विद्यार्थ्यांना स्वयंसेवकाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या स्वयंसेवकांची पोलिसांनी नावनोंदणीही केली असून त्यांना पोलिसांकडून काही टिप्सही दिल्या जात आहेत.

हजार जणांवर कारवाई
गणेशोत्सवाच्या काळात धुडगूस घालू नये यासाठी 1 ते 10 सप्टेंबर या काळात पोलिसांनी 146 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून येत्या 18 सप्टेंबर रोज एका गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

मद्यपान न करणार्‍या मंडळांना पारितोषिक
विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी क्रम लावण्यासाठी सुरुवातीपासूनच यावे. ऐनवेळी येणार्‍या मंडळांना गाड्या उभ्या करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे मंडळातील मद्यपींची ब्रेथ अँनालायझरने तपासणी केली जाणार असून तपासणी केल्यानंतर जे मंडळ स्टेजवर येऊन आमच्या मंडळात एकाही पदाधिकार्‍याने मद्यपान केलेले नाही, असे ठासून सांगेल अशा मंडळाला पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणाही पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी या वेळी केली.