आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयहिंद कॉलनीचे गेट पोलिसांनी हटवले; नागरिकांनी लावले !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील काही गृहनिर्माण सोसायट्यांनी गेट बसवून अंतर्गत रस्ते बंद केल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी प्रकाशित केले. याची दखल घेत वाहतूक शाखेने सकाळी दहा वाजता निराला बाजार परिसरातील जय हिंद कॉलनीतील गेट काढले; परंतु नागरिकांनी विरोध केल्याने केवळ दहा मिनिटांतच गेट पुन्हा बसवण्यात आले.

वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव सकाळी फौजफाट्यासह जय हिंद कॉलनीत गेले होते. त्यांनी वाहतुकीला अडथळा ठरणारा गेट हटवला; परंतु गेट हटवण्याचा अधिकार महापालिकेला असून यात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असे येथील नागरिक व नगरसेवक समीर राजूरकर यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे दहा मिनिटानंतर नागरिकांनी गेट पुन्हा बसवले. याबाबत नाथा जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, गेट बसवण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे की नाही याबाबत मनपाच्या संबंधित विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्याची माहिती आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

पैठण गेट ते निराला बाजार हा मार्ग वन-वे घोषित केल्यानंतर जय हिंद कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने नागरिकांनी गेट बसवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे दररोज हजारो वाहनचालकांना फटका बसत आहे. गेटमुळे दुचाकी, पादचार्‍यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनधारकांनाही त्रास होणार नाही आणि नागरिकांनाही तक्रार असणार नाही यासाठी दोन दिवसात सुवर्णमध्य काढू, अशी ग्वाही नगरसेवक राजूरकर यांनी दिली.

वन-वेची दिशा बदलण्याची शक्यता : जयहिंद कॉलनीजवळील पैठण गेट ते निराला बाजार हा मार्ग मनपाकडून वन वे घोषित करण्यात आला. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणानुसार हा मार्ग निराला बाजार (बाबूराव काळे चौक) ते पैठण गेट असा वन-वे करण्यात यावा, असे सुचवण्यात आले आहे. यासंबंधी नागरिकांनी पुढील सात दिवसांच्या आत आपली मते वाहतूक शाखा कार्यालय पैठण गेट येथे कळवण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे एसीपी अजित बोर्‍हाडे यांनी सांगितले.