आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला विळखा अनधिकृत होर्डिंग्जचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रतिनिधींपाठोपाठ राजकीय पक्षांच्या गल्लीबोळातील किरकोळ कार्यकर्त्यांनीही स्वत:ची छबी झळकावत शुभेच्छांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. वाहतूक बेट, चौक, मंदिरे, विजेचे खांब, पथदीपांसह मिळेल त्या जागी नियमबाह्य होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रूपीकरण करण्यात राजकीय मंडळींत जणू स्पर्धाच लागली असल्याचे चित्र शहरभरात दिसत आहे.

होर्डिंग्जमुळे मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असून, काही ठिकाणी अपघातांनाही होर्डिंग्ज कारणीभूत ठरत आहेत. असे असतानाही होर्डिंगबहाद्दरांवर कारवाई करण्याकडे महापालिका व पोलिस यंत्रणा डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने प्रमुख चौकांत लाखो रुपये खर्च करून दिशादर्शक कमानी उभारल्या आहेत. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगीशिवाय फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही मायको सर्कल, त्र्यंबक नाका, सीबीएस चौकात त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. तसेच त्र्यंबक नाका, मुंबई नाका, शिंगाडा तलाव, गंजमाळ, शालिमार चौक या भागांतील वाहतूक बेटांवरही होर्डिंग्ज लावून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, यातील एकही होर्डिंग अधिकृत नाही. त्याकडेही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने लाखोंचा महसूलही बुडत आहे. तरीही यंत्रणेकडून साफ दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमण विभागाचा कारभार व कर्मचार्‍यांविषयी संशय व्यक्त केला जात आहे. वाहतूक बेटांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असला तरी होर्डिंग्जमुळे त्याचे विद्रूपीकरणच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

स्वागतकमानींवर फुकट्यांची चमकोगिरी
शहरात मोठय़ा संख्येने पर्यटक येत असल्याने त्यांना मार्ग समजण्याच्या उद्देशाने आणि त्याचबरोबर मनपाच्या तिजोरीत भर पडण्यासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून ठिकठिकाणी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. या स्वागतकमानींच्या निम्म्या भागावर दिशादर्शक, तर दुसर्‍या भागात जाहिरात लावण्यात येते. मात्र, परवानगीशिवाय होर्डिंग्ज लावण्यास मनाई केली असून, न्यायालयानेही आदेश दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने एका ठेकेदारास काम दिले असून, तो मध्येच परागंदा झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, याच स्वागतकमानींवर महासभेत चर्चा करून पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याचा गवगवा करणारी हीच मंडळी होर्डिंगबाजीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

सर्वत्र होर्डिंग्जचा बाजार
राजकीय नेत्यांपासून ते गल्लीतील पक्षाचा वॉर्डप्रमुख, अशासकीय संघटना, राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून सर्रासपणे मिळेल त्या जागेवर होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. मंदिरे, चौक, वाहतूक बेट, विद्युत रोहित्र (डीपी), पथदीप, पुलाचे कठडे, संरक्षक भिंतींवर होर्डिंग्ज लावले जात आहेत. पवननगर भाजी मार्केट, उत्तमनगर, अंबड-लिंकरोड, मायको सर्कल, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, उंटवाडी परिसर, चांडक सर्कल, गंगापूररोड, कॉलेजरोड, जेहान सर्कल, महात्मानगर, पारिजात चौक, रविवार कारंजा, द्वारका चौकातही होर्डिंग्जचा भडिमार सुरू आहे. विशेष म्हणजे उपनगरेदेखील यातून सुटलेली नाहीत.