आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत होर्डिंग्जला 5 हजारांचा दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍यांना पाच हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (21 जून) मनपाच्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. मनपाच्या वतीने त्यासंबंधीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी (20 जून) करण्यात आले. तत्काळ तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

अनाधिकृत होर्डिंग्जसंबंधी खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. जागृती बहुउद्देशीय महिला मंडळाच्या सचिव भारती भांडेकर यांनी याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने महापालिकेस अनधिकृत होर्डिंग्जवर केलेल्या कारवाईसंदर्भात कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे अँड. अतुल कराड यांनी गुरुवारी (20 जून) कृती अहवाल सादर केला. मनपा प्रशासनाने 90 टक्के अनधिकृत होर्डिंग्ज काढले आहेत. विविध भागांतील प्रासंगिक आणि तात्पुरत्या शुभेच्छा फलकांवर कारवाईसंदर्भात प्रत्येक पोलिस स्टेशन आणि प्रभागनिहाय इमारत निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून 65 फलक काढण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात सात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत फलकांबाबत नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी 1800-233-6233 अशी टोल फ्री हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक संघटनांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावू नये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, असे अँड. कराड यांनी सांगितले. मनपातर्फे अँड. कराड यांच्यासह अँड. गिरीश कुलकर्णी मार्डीकर यांनी काम पाहिले.