आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Issue At Aurangabad For Aadhaar Card Documents

औरंगाबादेत युवतीला मेसेजद्वारे त्रास देणार्‍या तरुणासह दोघे अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आधार कार्ड बनवण्यासाठी आलेली महिलेची कागदपत्रे चोरून मोबाइलचे सिम कार्ड घेणार्‍या तरुणासह त्याला मदत करणार्‍या तरुणाला पोलिसांनी 30 जानेवारीला अटक केली. आधार कार्ड बनवणार्‍या एजन्सीत काम करणारा हा तरुण होता. त्याने या क्रमांकावरून एका युवतीला अश्लील एसएमएसही केले होते. न्यायालयाने या तरुणांची जामिनावर मुक्तता केली आहे.

चिकलठाणा येथील जेएमके इन्फोटेक एजन्सीत काम करणार्‍या तरुणांनी नागरिकांची मूळ कागदपत्रे जमा केली होती. ही कागदपत्रे बंगळुरूला पाठवली जात होती, तर आधार कार्ड रद्द झालेल्या नागरिकांची कागदपत्रे पुन्हा एजन्सीला पाठवण्यात येत होती. दरम्यान, सर्मथनगरातील अजय नरवडेने (32) या एजन्सीत कामाला असलेल्या प्रसाद कर्जतकर (25, रा. सर्मथनगर) याच्याकडे सिम कार्ड घेण्यासाठी त्याच्या कागदपत्रांच्या मागणीचा तगादा लावला होता. त्या वेळी पगार आणण्यासाठी गेलेल्या प्रसादने बजाजनगरातील एका 38 वर्षीय महिलेची कागदपत्रे अजयला दिली. या कागदपत्रांच्या आधारे अजयने मोबाइलचे सिम कार्ड घेतले. हे सिम वापरत असतानाच अजयने त्याच्या एका मित्राच्या मोबाइलवरून एका युवतीला मॅसेज पाठवण्यास सुरुवात केली. या युवतीने मोबाइल क्रमांकाची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. तपासाअंती पोलिस अजयच्या मित्रापर्यंत पोहोचले. तेव्हा हे मेसेज अजयने पाठवल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, अजय वापरत असलेल्या मोबाइलचे सिम कार्ड कोणाच्या नावे आहे, याचाही पोलिसांनी शोध घेतला. त्यात हे कार्ड बजाजनगरातील महिलेच्या नावावर असल्याचे उघडकीस आले.

तिची कागदपत्रे अजयपर्यंत कशी पोहोचली, याची पोलिसांनी चौकशी केली. त्या वेळी प्रसादने ही कागदपत्रे दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या दोघांना पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रोडरोमिओविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल फुला आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी अटक केली.