आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत निवासी भूखंडावर थाटली ‘दुकान’दारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदवाडी चौकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सिडको एन-2 मधील डी सेक्टरमध्ये विनय कॉलनी नावाची वसाहत आहे. या वसाहतीत विजय गावडे या केबल ऑपरेटरचे घर आहे. त्यांच्या घरासमोरच सिडकोच्या मंजूर रेखांकनातील निवासी प्लॉटसाठी आरक्षित भूखंड होता. या भूखंडाचा क्रमांक 26 डी असून आजच्या घडीला त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. अशी मोक्याची जागा पाहून गावडे यांनी त्यावर कब्जा केला. दहा वर्षांपूर्वी त्यांनी सिडकोला अंधारात ठेवून कुठलीही परवानगी न घेता या भूखंडावर दुकाने बांधली.

'कोट्यवधींची किंमत असलेला सिडकोचा एक मोठा निवासी भूखंड गिळंकृत करून एका केबल ऑपरेटरने त्यावर चार दुकाने बांधली. यातील तीन गाळे त्याने परस्पर भाड्यानेही दिले. त्यातून त्याची ‘दुकान’दारी सुरू आहे. विशेष म्हणजे एवढे सगळे होऊनही या भूखंडाची ना मनपा दप्तरी नोंद आहे ना सिडकोच्या. सिडको एन-2 मधील ठाकरेनगरातील विनय कॉलनीतील हा प्रकार. येथून सिडको कार्यालय जवळच आहे. तरीही सिडको अधिकार्‍यांना माहिती नसणे ही आश्चर्याची बाब आहे. डीबी स्टारने तपास सुरू केल्यानंतर मुख्य प्रशासकांनी कारवाईचे आदेश दिले.'


सिडकोची मान्यता नाही, शासनदरबारी नोंद नाही
हे गाळे भूखंड क्रमांक 26 वर उभारण्यात आले आहेत, पण या भूखंडाची नोंद कुठेही नाही. पालिका कर आकारणी कक्षातही त्याची नोंद नाही. त्यामुळे मालमत्ता कर भरण्याचा प्रश्नच नाही. अशा प्रकारे मनपाचा हजारोंचा महसूल दरवर्षी बुडत आहे. दुसरीकडे सिडकोने अतिक्रमणधारकास जागा धारण केल्याचे भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. असे असले तरी या भूखंडाची नोंद सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात असल्याचे गावडे यांनी सिडकोला कळवले. प्रत्यक्षात डीबी स्टार चमूने या प्रकरणाचा तपास केला असता सार्वजनिक न्यास नोंदणी विभागातही या भूखंडाची नोंद नसल्याचे उघड झाले.

सिडकोने केला होता पंचनामा
दिनांक 10 नोव्हेंबर 2000 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या जागेचा सिडकोने सर्वेक्षण करून पंचनामा केला होता. त्या वेळी तेथे फक्त मंदिर होते. तेव्हा या जागेवर दुकाने नव्हती. त्यानंतर मात्र गावडे यांनी या भूखंडावर कब्जा करून ती हडपली व व दुकानदारी थाटली.

डीबी स्टार चमूची पाहणी
चमूने प्रबोधनकार ठाकरेनगरात जाऊन या दुकानांची पाहणी केली. तेव्हा गावडे यांनी 440 पैकी साधारण 200 चौरस मीटर जागेवर दुकाने बांधल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी डीबी स्टारने दखल घेतल्याचे लक्षात येताच गावडे यांनी तत्काळ भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याचे फर्मान सोडले व सर्व गाळे एकाच रात्रीत रिकामेही करून घेतले. इतकेच नव्हे, तर या गाळ्यांचे शटर काढून पुरावा नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

सरकारी निवासी भूखंडावर दुकानदारी
सिडकोच्या मुळ मंजूर रेखांकनात निवासी प्लॉटसाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर आधी गावडे यांनी बाधकाम केले होते. वरील पंचनाम्यात सिडकोने अनधिकृत बांधकाम म्हणून त्याची नोंद केली. त्यानंतरही न कचरता गावडे यांनी चार गाळे काढले.

मुख्य प्रशासक चिडले
एवढे भयंकर प्रकरण असतानाही आमच्या अधिकार्‍यांना ते कसे माहिती नाही, असे म्हणत सिडकोचे मुख्य प्रशासक डी. डी. वळवी संतापले. डीबी स्टार चमुच्या तपासानंतर त्यांनी तत्काळ प्रशासक पी. बी. चव्हाण आणि मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांना दालनात बोलावले. लगेच या प्रकरणी स्थळ पाहणी करा व आठ तासांत मला अहवाल सादर करा, असे कडक आदेश दिले. साटोटे यांनी लगबगीने पाहणी केली व अहवाल सादर केला.

थेट सवाल: डी. डी. वळवी,मुख्य प्रशासक, सिडको

- सिडकोने या बांधकामाला परवानगी दिली आहे काय?
निवासी जागेच्या आरक्षणावर व्यावसायिक बांधकामाला कशी परवानगी देणार?

- भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ किती व त्यावर बांधकाम किती आहे.?
भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ 440 चौरस मीटर आहे. सर्वच जागा अतिक्रमणधारकाने व्यापलेली आहे. त्यात कुठलाही बांधकाम परवाना दिलेला नाही.

- या गाळ्यांबाबत आपल्याकडे काही नोंद आहे काय?
परवानगी दिली नसल्याने नोंद असण्याचा प्रश्नच येत नाही.

- जागा अधिकृत दिलेली आहे काय?
जागा सिडकोच्या मालकीची आहे. विक्रीचा व्यवहार झालेला नाही.

- मग आता काय कारवाई करणार?
उच्च न्यायालयाच्या आदेशाने 13 वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. तेव्हा या भूखंडावर कुठलेही गाळ्यांचे बांधकाम नव्हते. तुम्ही केलेल्या तपासातूनच हा प्रकार लक्षात आला. तत्काळ आम्ही जागेची पाहणी केली.अनधिकृत गाळे जमीनदोस्त करा, असे आदेशच मी मालमत्ता अधिकार्‍यांना दिले आहेत.

- इतके दिवस ही जागा वापरणार्‍या गावडेंवर काय कारवाई करणार?
मी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले आहे. सर्व नियम तपासणे चालू आहे.

थेट सवाल: विजय गावडे,अतिक्रमणधारक

- सिडकोच्या निवासी प्लॉटवर आपण कब्जा केला आहे..
मी असे काही केलेले नाही. तेथे आधीपासून मंदिर आहे.

- तुम्ही चार दुकाने बांधून भाड्याने दिली आहेत. त्याबाबत आमचा प्रश्न आहे..
मंदिराचा भंडारा, रंगकाम यासाठी ते बांधले आहे. माझा यात काही फायदा नाही. याची नोंदणीही केलेली आहे.

- दुकाने बांधण्याची परवानगी घेतली आहे का?
सिडकोत असे किती ठिकाणी आहे? कोण परवानगी घेतो? आता दुकाने पाडून टाकू. तेथे हॉल बांधू.