आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील सातारा, सावंगीतील 1500 मालमत्तांवर महिनाअखेर बुलडोझर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरालगतच्या झालरपट्टय़ातील दीड हजार बेकायदा मालमत्तांवर महिन्याच्या अखेरीस बुलडोझर फिरण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनानेच तसे संकेत दिले आहेत. म्हाडा किंवा सिडकोची परवानगी नसलेल्या सर्व मालमत्ता अवैध गृहीत धरण्यात येणार आहेत. सुरू असलेली अशी बांधकामे थांबवण्यासोबतच उभ्या मालमत्तांची पाडापाडी केली जाईल. विशेष म्हणजे एन-44 ची परवानगी असलेली घरेच वैध ठरवण्यात येणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या महिन्यात यासंबंधी निर्देश दिले होते. काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश होते. त्यावर अधिकार्‍यांनी पाहणी अहवाल सादर केला असून, रूपरेषा आखल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी म्हटले आहे. अहवालात सातारा, सावंगी, करोडी, शरणापूर, कुंभेफळ आदी गावांतील 1500 मालमत्ता अवैध ठरवण्यात आल्या. तथापि, सातारा भागाला जास्त फटका बसू शकतो.

अशी होईल सुरुवात : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता 21 ऑगस्ट रोजी संपेल. त्यानंतर तलाठी या भागांची पाहणी करतील. सुरू असलेली बांधकामे थांबवण्याबरोबरच ती पाडून घेण्याची नोटीस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात बांधकामे थांबवली जातील आणि नंतर म्हणजेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पोलिस संरक्षणात बांधकामे पाडण्याची कारवाई हाती घेतली जाईल.

आधी हातोडा एनए-45 वर
>एनए-45च्या मालमत्ता आधी पाडणार. त्यांना म्हाडा, सिडकोचा परवाना नसतो.
>एनए- 44वर वैध बांधकाम केले, पण सिडको, म्हाडाची परवानगी नसेल तर कारवाई.
>खुल्या भूखंडावरील काम.

जिल्हाधिकारी म्हणतात आचारसंहितेनंतर बघू
अहवाल आला असून, आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी म्हटले आहे. मात्र, कारवाईचे पूर्ण नियोजन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.