आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षे, 23 निवेदने, तरी होते खुलेआम दारूविक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध दारूविक्रीवर डीबी स्टारने ‘बेबंदशाही’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. सारे शहर दारुड्यांच्या कब्जात कसे गेले याचा पर्दाफाश केला. मात्र याच शहरात असा एक भाग आहे, जेथे 20 पेक्षाही जास्त देशीचे अड्डे असून चक्क टपर्‍यांवर भांड्यांमधून दारूविक्री होते. काही ठिकाणी तर चक्क महिलाही दारू विकतात. शिवाजीनगर-मुकुंदवाडीतील ही परिस्थिती. देशीचे अवैध अड्डे आणि ही जीवघेणी मद्यविक्री बंद व्हावी म्हणून काही जागरूक नागरिकांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना 7 वर्षांत तब्बल 23 निवेदने दिली, पण परिणाम शून्य. या दारूमुळे येथील लोकांना विविध आजार जडले आहेत. अर्ज-विनंत्या आणि निवेदने करूनही काहीच फायदा होत नसल्याने या भागातील दोन जागरूक नागरिकांनी डीबी स्टारकडे धाव घेतली. आमच्या भागातल्या नागरिकांना वाचवा हो..म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली. त्यानंतर डीबी स्टार चमूने तेथे जाण्याचा निर्णय घेतला.

चमूला आलेला अनुभव
सकाळी 6 वाजता सिडको एन-4 च्या मागच्या बाजूने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावरून किंवा शिवाजीनगरच्या नेहरू कॉलेजवरून त्या दिशेने जातानाच आपण वेगळ्याच विश्वात जात असल्याचा अनुभव चमूला आला. एक तर धड रस्ता नाही. पावसाळ्यातील वाळलेल्या चिखलाच्या मार्गातून वाट काढताना जागोजागी लोक रस्त्यावरच शौचाला बसलेले होते. झिणझिण्या आणणार्‍या त्या दुर्गंधीतून कसेबसे शिवाजीनगरात दाखल झालो.

सकाळीच अड्डय़ांवर रांगा
बिहारलाही लाजवेल असे चित्र येथे पाहायला मिळाले. सकाळी सकाळीच देशीच्या टपर्‍यांवर दारू ढोसण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. काही घरांमध्ये तर चक्क महिला दारू विकत होत्या. घरातच एका कोपर्‍यात टेबलावर स्टीलच्या हंड्यात दारू भरून ठेवलेली. एका ग्लासात देशीचा पेग भरून लोक तेथेच तो रिचवत होते.

धार्मिक स्थळांचेही भान नाही
हा भाग गुंठेवारीत असला तरी बहुतांश घरे काँक्रीटची असून घनदाट वस्ती आहे. येथे बहुतांश कामगार, गवंडीकाम करणारे मिस्तरी व इतर कामे करणार्‍या लोकांचे वास्तव्य आहे. ओबडधोबड रस्त्यांतून वाट काढत गेलो की काही ठिकाणी मंदिर, कुठे मशीद. जवळच मनपाची शाळा.. असे असतानाही या पवित्र वास्तूंपासून हाकेच्या अंतरावर देशीचे अवैध अड्डे. सकाळी 6 ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मधुशाळा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे अनेकांनी सांगितले.

दुचाकीवर कॅनमध्येही दारू
जणू काही हा भाग शहरापासून कोसो दूर असून येथे अनियंत्रित कारभार चालत असल्याप्रमाणे आणखी एक चित्र दिसले. ते म्हणजे मोटारसायकलवर कॅनमध्ये दारू भरून आणणे. शहराच्या इतर भागात आपण दूधवाले जसे पाहतो तशी दारू या भागात मोटारसायकलवर आणणारेही काही महाभाग आहेत. पोलिस अन् उत्पादन शुल्क विभागाचे अजिबात लक्ष नसल्याचेच यातून स्पष्ट होते.

रेल्वेस्थानकाभोवतीही अड्डे
शिवाजीनगर अन् मुकुंदवाडीला जोडणारा एक 100 फुटांचा रस्ता तयार झाला आहे. तो नेहरू कॉलेजपर्यंत चांगला आहे. तेथून पुढे हा रस्ता संपतो आणि सुरू होते ते घाणीचे साम्राज्य. समोर मोठा खड्डा लागतो. त्यावर दोन तुटलेले लोखंडी अँगल टाकलेले आहेत. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर पोहोचताच तेथे दोन्ही बाजूंना टपर्‍या दिसतात. काही ठिकाणी पिठाच्या गिरण्या आहेत, तर काही ठिकाणी पत्र्याचे शेड हिरव्या ताडपत्रीने झाकलेले आहेत, तेथेच दारू मिळते. याच ठिकाणी एका उघड्या टपरीवर दिवसभर एका स्टीलच्या भांड्यातून दारू विक्री होते.

रेल्वेस्थानकावरही बेवड्यांचा वावर
रेल्वेस्थानकाला खेटूनच ही वसाहत असल्याने स्थानकावर दिवसभर या दारुड्यांचा वावर असतो. औरंगाबाद-जालना अपडाऊन करणारे मात्र रोज या दारुड्यांचा सामना करीत प्रवास करतात.

भल्याभल्यांना व्यसन जडले
शिवाजीनगर-मुकुंदवाडी भागात बहुतांश गवंडीकाम करणार्‍यांची घरे आहेत. शहर झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र फ्लॅट अन् घरांच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे या लोकांना चांगला रोजगार मिळत आहे. एक माणूस रोज सहाशे ते सातशे रुपये कमावतो. मुलगा अन् पत्नीही कामावर जात असल्याने बर्‍यापैकी पैसा हातात येऊ लागला. त्यातच या भागात आधीच अनेक देशीचे अड्डे असल्याने कधी-कधी थकवा घालवण्यासाठी लोक दारू पितात. यातूनच मग त्यांना व्यसन जडू लागले. सध्या त्याचे प्रमाण खूपच वाढले.

7 वर्षांपासून निवेदने
गेली सात वर्षे पोलिस, उत्पादन शुल्क विभागाला दारूबंदीसाठी पत्रे देत आहे. गेल्या 7 वर्षांत आम्ही 23 निवेदने दिली आहेत, परंतु त्याकडे कुणीही लक्ष देत नाही.- अविनाश वाहूळ, नागरिक