आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांचे स्वागत महत्त्वाचे की कायद्याचे पालन?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वेळोवेळी विविध पक्ष, संघटना आणि कार्यकर्ते पोस्टरबाजी करतात. भाजप मात्र स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतो, पण मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शहरभरात सर्वत्र विनापरवानगी पोस्टरबाजी करून भाजपने विद्रूपीकरण केले आहे. सध्या भाजप सत्तारूढ पक्ष आहे. न्यायालयाचे आदेश धुडकावून शहर विद्रूपीकरण करणाऱ्या आपल्या पक्षनेत्यांवर कार्यकर्त्यांवर पालिका गुन्हे दाखल करतील काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे काँग्रेसनेही धडक मोर्चाच्या नावाखाली पोस्टरबाजी करत शहराच्या विद्रूपीकरणात भर टाकली आहे. जोडिलाच शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर पक्षांनीही त्यांचीच री ओढली आहे. जवळपास आठ वर्षांनंतर आज शहरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवंेंद्र फडणवीस यांच्यासह जवळपास सर्वच मंत्र्यांच्या स्वागताची पोस्टर्स दुभाजक अन्यत्र लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करत
मकोगिरी, चाटूगिरी, दिखावा आणि दहशत निर्माण करण्यासाठी पोस्टरबाजी केली जाती. वाहतुकीला अडथळा, सरकारी- खासगी संपत्तीचे विद्रूपीकरण खुले आम केले जाते. छोटे कार्यकर्ते मोठ्यांचे आणि मोठे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचे विद्रूप स्वागत करतात. कोणताही पक्ष अशा स्वागताचे ऑन रेकॉर्ड स्वागत करत नसला तरी कोणीही असे करू नका म्हणून गांभीर्याने सांगत नाही. मागे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले होते खरे, पण त्यानंतर त्यांच्या एका कार्यकर्त्याला कोर्टाने दंड ठोठावला. एकूणच राजकारणी, अनेक संघटना आणि काही पोस्टरबाज गुंड नेहमी हा उद्योग करत असतात.

या वेळी मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शहरात बेकायदा पोस्टरबाजी करण्यात पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने पक्षातील चापलुसांनी बड्या नेत्यांसमोर लोटांगण घालण्यासाठी शहरातील वाहतूक आणि सौंदर्य वेठीस धरले आहे. भाजपने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. औरंगाबादेत आणि इतर ठिकाणीदेखील पक्षाने हा ‘मान’ मिळवला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना बेकायदा पोस्टरबाजी केल्याप्रकरणी न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोटावला होता. असे झाल्यानंतरही पक्षाने काही डिफरन्ट केलेले दिसत नाही. शेलार यांच्यासाठी हा दंड कदाचित ‘किस दरिया में खसखस’ असेल. पण न्यायालयाने कानाखाली लगावल्याचे वळ पक्षासाठी पुरेसे असतील, असे वाटले होते. ‘इस थप्पड की गुंज’ दिल्लीपर्यंत जाईल असेही वाटले.

त्यानंतर पक्षासाठी पोस्टरबाजीबाबत आचारसंहिता येईल असेही आमच्या भाबड्या मनाला वाटले. पण तसे घडलेले दिसत नाही. घडले असेलही तर त्याची अंमलबजावणी पक्षातील (बे)जबाबदार पदाधिकाऱ्यांंनी केलेली नाही. आज शहरात देवेंद्र फडणवीस आणि बबनराव लोणीकरांचे जंगी स्वागत बडे नेते करत आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच शहर भाजप अध्यक्षांनी डीबी स्टारला आमचा पक्ष बेकायदा पोस्टरबाजी आणि विद्रूपीकरण करणार नाही, असे वचनपत्र दिले होते. मात्र, इतर पक्षांप्रमाणे त्यांनीही वचन पाळलेले नाही.
कुठे कुठे आहेत पोस्टर्स
चिकलठाणाविमानतळा पासून रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, सिडको उड्डाणपूल, सिडको टी पॉइंट ते एसबीआय चौक, शरद टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट, दिल्ली गेट ते सुभेदारी गेस्टहाऊस, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात, तर पोस्टरची गर्दी दिसत आहे. मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धाच कार्यकर्त्यांमध्ये लागली.

यांनी लावले पोस्टर्स
{भाजप आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल चौधरी, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप भारतीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू बागडे, सतीश खेडकर.

{ औरंगाबाद शहर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव गाडेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार.
{ महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील गोसावी, याच पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अरुणा साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, महापौर त्र्यंबक तुपे,

असा आहे नियम
सन२०११ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार औरंगाबाद मनपा हद्दीतील सौंदर्यबेट, दिशादर्शक फलक, सिग्नल तसेच दुभाजकांवरील पथदिव्यांच्या खांबावर पोस्टर लावण्यास परवानगी नाही. अशा ठिकाणी पोस्टर लावल्यास तो महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये कलम -३ नुसार गुन्हा आहे. यावर संबंधित पोलिस ठाण्यात मनपाच्या इमारत निरीक्षकांना फिर्याद देण्याचे अधिकार आहेत.

परवाना दिलाच नाही
कोणालाही पोस्टर लावण्याचा परवाना दिला नाही. त्याव्यतिरिक्त कुठल्याही पक्षाने परवानगी घेतलेली नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता दुभाजक, वाहतूक बेट, सौंदर्यबेट आणि फुटपाथलगत पोस्टर्स अथवा होर्डिंग्जला परवानगीच देता येत नाही. त्यामुळे आम्ही परवाना देण्याचा प्रश्नच येत नाही. शफीअहमद, मालमत्ताअधिकारी, मनपा.

आमदार, महापौर आणि उपमहापौर बेकायदा स्वागतोत्सुक
मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांचे स्वागत करण्यात स्वत: आमदार, महापौर आणि उपमहापौर आघाडीवर आहेत. कुठलीही परवानगी घेता या सर्वांनी बेकायदा पद्धतीने पोस्टर्स फलक लावले आहेत.
बातम्या आणखी आहेत...