आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूची अवैध वाहतूक, ट्रॅक्टरखाली दबून १ ठार, गिरजा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर काेसळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- तालुक्यातील वानेगाव शिवारात रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर गिरजा नदीच्या पुलावरून उलटून त्याखाली एक जण दबून ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. २) रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात 
आली आहे.

हरिदास काशीनाथ शेरकर (३२, रा.शेरकर वस्ती, खुलताबाद रोड, फुलंब्री)  असे वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वानेगाव शिवारातील गिरजा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा केला जातो. असाच वाळू उपसा करणारे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास नदीतून वाळू घेऊन येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गिरजा नदीच्या पुलावरून खाली कोसळले. 

या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर तीन जण बसलेले होते. त्यापैकी दोन जण सुखरूप वाचले. मात्र, हरिदास शेरकर हा ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला जेसीबीच्या मदतीने काढून फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव करीत आहेत.

ट्रॅक्टरला क्रमांकच नाही 
फुलंब्री शहर आणि परिसरात शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रोज शेकडो ट्रॅक्टरने हजारो ब्रास वाळू उपसा केला जातो. या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉलीला कुठल्याही प्रकारचा क्रमांक आढळून येत नाही. अपघात घडल्यानंतर या ट्रॅक्टरवर नंबर प्लेट लावली जाते. वाळू तस्करी करणाऱ्या चालक व मालकाचे अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याने हा धंदा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...