आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगपुर्‍यातील मुख्य रस्त्यावरील झाडांवर कुणी घातला घाव?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगपुर्‍यातील मुख्य रस्त्यावरील झाडांची दोन वेळा कत्तल करण्यात आली आहे. वीस वर्षे जुन्या या मोठय़ा झाडांवर कुर्‍हाड चालवण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे प्लेटोफोरम जातीची ही झाडे आपल्याकडे दुर्मिळ आहेत. शिवाय वडाची झाडेही तोडली आहेत. मात्र, वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या कुणी झाडे तोडली याचा पत्ताच लागत नाही हे विशेष.
प्रकरण 1
आधी प्लेटोफोरमची झाडे तोडली
नाथ मार्केट परिसरातील नाल्यालगतच्या बहुमजली इमारतीजवळची तीन मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबत जागरूक नागरिकांनी डीबी स्टारला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत तीनही झाडे मोठय़ा प्रमाणावर तोडण्यात आली होती. त्यानंतर वृक्षतोड करणार्‍यांनी पळ काढला.
हाताची घडी अन् तोंडावर बोट
डीबी स्टारचे पथक पोहोचल्याचे कळताच तेथील सुरक्षा रक्षकांनी फोनाफोनी सुरू केली. त्यानंतर यंत्रणा ह्यकामालाह्ण लागली. आमच्या चमूने झाडे तोडणार्‍याबद्दल चौकशी केली. मात्र, परिसरातील व्यापार्‍यांनी ह्यहाताची घडी, तोंडावर बोटह्ण ही सोयीस्कर भूमिका घेतली. त्यामुळे झाडे तोडण्यामागे कुणी मोठी व्यक्ती असल्याचा संशय बळावतो
प्रकरण 2
वडाची झाडे तोडली..
याच ठिकाणी दुसर्‍या वेळी वडाच्या झाडावर कुर्‍हाड चालवली गेली. जागरूक नागरिकांनी दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर डीबी स्टार चमू घटनास्थळी पोहोचला. वडाची दोन झाडे काही लोक तोडत असल्याचे दिसले. आम्ही त्याची छायाचित्रे काढत असतानाच स्वत:ला मोहन जोशी म्हणवणारा एक माणूस तेथे आला. तुम्ही कोण? इथं कशाला आलात? तुम्हाला काय करायचेय? असे म्हणत त्याने अरेरावी केली. आम्ही व्यापार्‍यांनी निधी गोळा करून वृक्षतोड केल्याचे तो म्हणाला. वीज तारांना अडथळा होता म्हणूनच आम्ही केवळ फांद्या तोडल्या, असा दावाही त्याने केला. मात्र, आम्ही अधिक प्रश्न विचारताच त्याची बोबडी वळाली.
परवानगी घेतली नाही
नाथ मार्के ट परिसरातील वृक्ष तोडणार्‍यांनी आमच्या विभागाकडे परवानगीचा अर्ज सादर केलेला नाही. आम्हाला डीबी स्टारकडून ही माहिती मिळाली. सुटीचा दिवस साधून हा गुन्हा केलेला आहे. याचा तपास करून वृक्ष तोडणार्‍यावर कारवाई केली जाईल.
विजय पाटील, उद्यान अधीक्षक
हा तर मनावर घाव.
मी महानगरपालिकेत 1998 च्या दरम्यान उद्यान अधीक्षक असताना ही झाडे लावली होती. नाथ मार्केट रस्त्यालगत लोकांना आणि रिक्षाचालकांना सावली मिळावी यासाठी नाल्यालगत 40 झाडे लावली होती. हा झाडांवर नाही, तर माझ्या मनावर घाव आहे. लोकांनी झाडांवर प्रेम केले पाहिजे.
जे. एम. भडके, माजी उद्यान अधीक्षक, मनपा
कायद्यावर कुर्‍हाड
महाराष्ट्र वृक्ष जतन अधिनियम 1975, नागरी क्षेत्र प्रकरण 8 च्या कलम 21 नुसार वृक्ष तोडण्यास परवानगी आवश्यक आहे. बांधकाम करताना, विद्युत तारांना वृक्ष आड येत असतील, बांधकामाला अडथळा निर्माण करत असतील, मालकी हक्कात येत असतील किंवा वृक्षापासून जीवित हानीचा धोका असेल, वृक्ष जीर्ण झाले असतील अशा वेळी वृक्ष प्राधिकरण अधिकारी अथवा सदस्याकडे अर्ज सादर करावा लागतो. मात्र, या प्रकरणात कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे डीबी स्टारच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
शिक्षेची तरतूद
शहरांमध्ये सगळीकडे काँक्रीटचे जंगल उभे असताना, अस्तित्वात असलेल्या झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, अशी झाडे तोडणार्‍यांना शिक्षा मात्र कमी होते. कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाला तर अपराधाचे मूल्यमापन करून एक हजार ते पाच हजारांपर्यंत दंड किंवा एक आठवडा ते एका वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.