आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हडकोच्या मुख्य जलवाहिनीवर डल्ला; चार हजारात नळ कनेक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हडकोवासीयांना पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला भगदाडे पाडून पाणीचोरी होत असल्याचे डीबी स्टारच्या छाप्यात उघड झाले. काही वसाहतींना पाणी मिळत नाही. त्यामुळे प्लंबर, पोलिस आणि पालिका कर्मचार्‍यांचे फावत आहे. 4 हजार रुपये घेऊन अनधिकृत जोडण्या दिल्या जात आहेत. मात्र, मनपाचे शाखा अभियंता, उपअभियंता याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत.

हसरूल कारागृहालगत एकतानगर येथील 15 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या जलकुंभावरून हसरूल जेल, हडको एन 13, रोजाबाग, शिवछत्रपतीनगर, हॉटेल ताज, भरतनगर आदी वसाहतींत पाणीपुरवठा करणारी 300 मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून दिवसभरात 6 तास पाणीपुरवठा चालू असतो. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता म्हणून आर. एन. संधा, तर शाखा अभियंता म्हणून एस. एस.शिंदे, के. पी. पवार काम पाहत आहेत. या जलवाहिनीवरून मुजफ्फरनगर, एकतानगर, पटेल प्लॅन आदी भागातील लोकांना अनधिकृत नळजोडणी देण्याचे काम तीन जणांची टोळी करते.

रविवार, 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता जटवाडा रोडलगत व्हीआयपी रस्त्यावर अनधिकृत नळजोडणी दिली जात असल्याची तक्रार काही जागरूक नागरिकांनी डीबी स्टारकडे केली. चमू काही वेळातच येथे पोहोचला. तेव्हा चार फुटांचा ख़ड्डा करून मुख्य जलवाहिनीला अर्धा इंचीचे पाच होल मारलेले दिसले. मातीच्या ढिगार्‍यावर प्लास्टिकचे पाइप पडलेले होते. घटनास्थळी चमू आल्याची कुणकुण लागताच लाइनमन शेख महेबूब काही वेळात तेथे पोहोचले व त्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन देणारा यशवंत तेजराव जाधव याच्याकडून साहित्य जप्त केले. मात्र, काही लोकांनी लाइनमनवर दबाब आणला व साहित्य परत करण्यास भाग पाडले. लाइनमनने वरिष्ठांना फोनाफोनी केली, मात्र त्याच्या मदतीला कुणी आले नाही.

अधिकृत नळधारकांची पाण्यासाठी पायपीट : या सर्व प्रकारांमुळे अधिकृत नळ कनेक्शनधारकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. कर भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याने व अल्प दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवाशांच्या भावना दुखावल्या आहेत.

वरिष्ठांचा कानाडोळा : रोजाबाग, हॉटेल ताज, हडको एन 13, शिवछत्रपतीनगरच्या बहुतांश वसाहती व भरतनगरात कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे पालिकेचे लाइनमन व येथील रहिवासी यांच्यात सतत वादावादी होते. याविषयी रहिवासी व लाइनमन महापालिकेत सतत पाठपुरावा करतात, मात्र अधिकारी कानाडोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

16 हजार अनधिकृत नळ कनेक्शन : व्हीआयपी रस्त्यावरून जटवाडा परिसरातील मुजफ्फरनगर, एकतानगर, पटेल प्लॅन आदी परिसरात तब्बल 16 हजार अनधिकृत नळ कनेक्शन दिले असल्याचे यशवंत जाधव याने सांगितले.


नियम काय सांगतो
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या अनुसूचित प्रकरण 10 नियम 16 0 18 तसेच भारतीय दंडप्रक्रिया संहिता 1973 कलम 145/148 व आयपीसी 379 नुसार अनधिकृत नळधारकावर हद्दीतील पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे. यात सर्शम करावास व दंडाची शिक्षा आहे.

अधिकारी लक्ष देत नाहीत
लोक आम्हालाच पकडतात. उपअभियंता आर.एन.संधा, एस.एस.शिंदे, मेहेत्रे, के.पी.पवार तक्रार करूनही येत नाहीत. अनधिकृत नळ जोडणार्‍यांना पकडले तर लोक अंगावर येतात.
-शेख महेबूब, मोहंमद अलीम. लाइनमन, मनपा

पालिका, पोलिस पैसे घेतात
मी एकटाच नव्हे, तर अशोक राठोड व हसरूलचा गायकवाड हे सर्व अनधिकृत नळ जोडून देतात. आम्ही कुणाची परवानगी घेत नाही. पालिका पैसे भरूनही पाणी देत नाही. मी बिनधास्त काम करतो. यातही पालिकेचे कर्मचारी व पोलिस पैसे घेतात.
-यशवंत जाधव, प्लंबर

त्या जोडण्या तोडणार
या भागात कनेक्शन देण्यासाठी अभय योजनात काही संचिका मंजूर आहेत. हसरूल परिसरातील एका विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. मात्र, तीही आटली. अनधिकृत नळ कनेक्शन तोडणार आहोत.
-आर.एन.संधा, प्रभारी उपअभियंता, मनपा.

आपोआप हे धंदे बंद होतील
या जलवाहिनीला खेटून 100 मिमी व्यासाची दुसरी पोटलाइन या भागासाठी टाकणार आहोत. या लाइनमधून अभय योजना चालू क रून सर्वांना पाणी दिले जाईल. यामुळे आपोआप अनधिकृत नळ कनेक्शन बंद होतील.
-ज्योती वाघमारे, नगरसेविका