आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Wines Stocks, Latest News In Divya Marathi

एसडीओच्या वाहनात अवैध मद्यसाठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी एन. आर. शेळके यांच्या झायलो गाडीतून 17 मार्च रोजी 2,150 रुपयांचा विदेशी मद्याचा साठा सिडको पोलिसांनी जप्त केला. विशेष म्हणजे कारवर अंबर दिवा लावून ‘ऑन इलेक्शन ड्यूटी’ असे स्टिकर चिकटवलेले आहे. गाडीमधील दोघांना सिडको पोलिसांनी अटक केली.
सकाळी 10 वाजता सिडको एन-7 पोलिस ठाण्याच्या बाजूला काळ्या रंगाचे एसयूव्ही उभे होते. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये विदेशी मद्याचा साठा आणि रोकड असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. गाडीमध्ये ब्लेंडर्स प्राइड, विविध प्रकारच्या बिअरच्या बाटल्या ठेवल्याचे आढळले. त्या वेळी गाडीच्या जवळ उभे असलेल्या दोन तरुणांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मद्याचा साठा त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली. विजय विश्वनाथ झिने (32, रा. ब्रिजवाडी) आणि संतोष यमाजी महापुरे (28, सिडको एन-1) अशी त्यांची नावे आहेत. गाडी आणि मद्यसाठा पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांच्या तक्रारीनुसार सिडको ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला. सरकारी अधिकारी नसताना अंबर दिव्याचे वाहन वापरल्याचे कलम (171, 34) आणि मद्याच्या अवैध साठय़ामुळे मुंबई पोलिस कायद्याचे कलम 65 (ख) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दोघांनाही दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत पुढील तपास करत आहेत.
शासनाने भाडेतत्त्वावर घेतले वाहन : उपविभागीय अधिकारी शेळके यांच्या मालकीचे वाहन नसून शासनाने खासगी वाहन भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. त्यावर अंबर दिवा लावून शासनाने शेळके यांना वापरण्यासाठी ही गाडी दिलेली आहे. शेळके हे एन-1 येथे राहत असून सुटी असल्यामुळे त्यांनी वाहन घरी आणले होते.