आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर सर्रास दारूविक्री; पोलिस, उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील बिअर बार, वाइन शॉप, बार,रेस्टाॅरंट आदी एप्रिलपासून बंद करण्यात आले. मात्र, औरंगाबाद-नगर तसेच औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील ढाब्यांवर स्थानिक पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने सर्रास मद्यविक्री मद्यपान सुरू असल्याचा प्रकार १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेतून समोर आला आहे.
 
या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलिस मद्यविक्री मद्यपान सुरू असणाऱ्या ढाबेचालकांवर कारवाई करतील, अशी आशा बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड झाल्यामुळे परिसरातील अवैध दारूविक्री पुन्हा एकदा नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील बिअर बार, वाइन शॉप आदी बंद करण्यात आले. मात्र, बार किंवा रेस्टाॅरंट बंद झाले तरी काहींनी यातून पळवाट काढून मद्यविक्री सुरूच ठेवल्याचे चित्र दिसत आहे. औरंगाबाद शहरातून नगर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राज्यमार्गावर अनेक ढाबे तसेच लहान-मोठी उपाहारगृहे आहेत. यातून अवैधरीत्या तसेच छुप्या मार्गाने दारूविक्री सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे.
 
महामार्गालगतच्या ढाब्यांवर मद्यपान करण्याची व्यवस्था असल्यामुळे अनेक दारुडे वाइन शॉपवरून दारू खरेदी करत पिण्याची व्यवस्था असणाऱ्या संबंधित ढाब्यांवर जाऊन राजरोसपणे मद्यपान करताना दिसतात. ग्राहकांना दारू पिण्याची परवानगी दिली नाही तर ढाबा कसा चालणार, असे अनेक ढाबेचालक खासगीमध्ये सांगतात. मात्र,ज्या हेतूने न्यायालयाने हा लोकहिताचा निर्णय घेतला आहे, त्या हेतूला अप्रत्यक्षरीत्या बाधा पोहोचवण्याचे काम अवैधरीत्या मद्यविक्री मद्यपानासाठी सरावलेल्या ढाबेचालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होत असल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे. 
 
काय घडले १४ जुलै रोजी? 
स्थानिक पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परिसरातील ढाबेचालक आदींकडून कुठल्याही प्रकारे अवैधरीत्या मद्यविक्री मद्यपान सुरू नसल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रशासनाचा खोटारडेपणा १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेतून समोर आला आहे. शुक्रवार, १४ जुलै रोजी ग्रामीण भागातील एटीएम केंद्रात रोख रक्कम टाकण्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद येथील ‘लॉजिक कॅश’ कंपनीच्या व्हॅनमधून (एमएच २० एक्स ३९३७) रोख ४० ते ४२ लाख रुपयांची रक्कम घेऊन चालक कडुबा साळवे (४७, रा. फुलेनगर, उस्मानपुरा), योगेश काजळकर अल्बर्ट असे तिघेजण गंगापूरच्या दिशेने असणाऱ्या एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी निघाले होते. 

दरम्यान, व्हॅनचा चालक कडुबा साळवे त्याच्या दोन सहकाऱ्यांनी वाळूजलगत नगर महामार्गावर असणाऱ्या एका ढाब्यावर मद्यप्राशन केले. त्यानंतर ते पुढे दारूच्या नशेत गंगापूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, अति मद्यपान केल्यामुळे चालक कडुबाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे व्हॅन दहेगाव बंगल्याजवळील रस्त्याच्या दुभाजकावर आदळून उलटली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळेच आतील लाखो रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. किरकोळ जखमी तिघांना पोलिसांनी मदत केली. तसेच मद्यपान करणाऱ्या चालक कडुबा साळवेविरोधात वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
वाळूज परिसरातील ढाब्यांवर मद्यपान केले जात नाही. संबंधित चालकाने घटनेच्या दिवशी ढाब्याबाहेर व्हॅन उभी करत व्हॅनमध्येच मद्यपान केले होते, ढाब्यावर नाही. 
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक,वाळूज. 
 
बातम्या आणखी आहेत...