आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाची जमीन परस्पर दुसऱ्याला विकली; भूसंपादनाचा मोबदलाही लाटला, तिसगावातील प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाच तो जीपीए. ज्यात माझी बनावट सही केल्याचा पुंगळे यांचा दावा आहे. - Divya Marathi
हाच तो जीपीए. ज्यात माझी बनावट सही केल्याचा पुंगळे यांचा दावा आहे.

औरंगाबाद - शहरालगत असलेल्या गावात एक जण बिल्डरकडून प्लॉट खरेदी करतो. रीतसर रजिस्ट्री करून महसूलही भरतो. जेव्हा काही वर्षांनी तो आपल्या प्लॉटवर जातो तेव्हा कुणीतरी त्यावर काम करताना त्याच्या निदर्शनास येते. तो संबंधिताला विचारणा करतो तेव्हा या प्लॉटचा मी मालक आहे असे सांगत त्याच्या नावाची कागदपत्रेही दाखवतो. त्याला धक्का बसतो. खोलात जाऊन माहिती घेतो तेव्हा बनावट कागदपत्रे तयार करून आपली जमीन बिल्डरने परस्पर दुसऱ्याला विकल्याचे त्याला समजते. तो तत्काळ पोलिसांत तक्रार देतो. मात्र, याला ६ महिने उलटतात तरी ना तपास होतो ना गुन्हे दाखल होतात. या प्रकरणाचा डीबी स्टारने तपास केला असता सिडकोच्या अधिक्षेत्रात जमीन खरेदी-विक्रीचा कसा गोरखधंदा सुरू आहे हे पुन्हा एकदा उघड झाले. 

 

जवाहर कॉलनी भागातील एसटी महामंडळाचे निवृत्त वाहतूक नियंत्रक कैलाश शेषराव पुंगळे यांनी ११ ऑगस्ट १९८७ रोजी तिसगाव परिसरात कुबेर लँड डेव्हलपर्सचे प्रकाश कुंदनमल संचेती यांच्याकडून गट क्रमांक १७० मधील १३९.५ चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केला होता. निवृत्तीनंतर प्लॉटचे काम करायचे म्हणून ते सहज तिसगावला गेले. तेव्हा आपल्या प्लॉट क्रमांक ९ वर सुरेश जगताप हे काम करताना त्यांना दिसले. जगताप यांनी हा प्लॉट नितीश केवलचंद जैन व रवींद्र जयचंद बोरा यांच्याकडून रीतसर विकत घेतल्याचे पुंगळे यांना सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्याची रजिस्ट्री व बांधकाम परवानगीही पुंगळे यांना दाखवली. हे पाहून पुंगळे याना धक्का बसला. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असता त्यांच्या प्लॉटची जमीन ही १९९९ मध्ये सिडकोच्या अधिक्षेत्रात संपादित झाली आहे. जमीन मालकाने सिडकोच्या नव्या नियमानुसार या जमिनीचे परस्पर नवीन रेखांकन तयार करून ती पुन्हा दुसऱ्यांना विकली असल्याचे त्यांना कळाले. शिवाय भूसंपादनाचा पैसादेखील उचलला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी पुंगळे यांनी १० मे २०१७ रोजी थेट पोलिस आयुक्तांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

 

डीबी स्टार तपास
या प्रकरणाचा डीबी स्टारने तपास केला तेव्हा १९८७ मध्ये मे. कुबेर लँड डेव्हलपर्सचे मालक प्रकाश संचेती यांच्याकडून पुंगळे यांनी प्लॉट घेतला होता. यानंतर १९९२ मध्ये कुबेर यांची सर्व जमीन ही सिडकोच्या अधिक्षेत्रात गेली होती. सिडकोने नवीन विकास आराखडा तयार करून अधिक्षेत्रात येणाऱ्या जमिनीतून २५ टक्के जागा संपादित करून उर्वरित जमिनीचे नव्याने रेखांकन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मूळ मालकाने चक्क बोगस जीपीए तयार करून जमिनीचा २५ टक्के भूसंपादनाचा मोबदला परस्पर उचलून नव्याने रेखांकन तयार केले व ही जागा इतर अनेकांना विकली. ही प्रक्रिया करत असताना विकलेल्या जमीनधारकांच्या नावे खोटे दस्तऐवजही त्यांनी तयार केले. 

 

असे तयार झाले बोगस दस्तऐवज
सिडकोकडून संपादित जमिनीचा मोबदला आणि नव्याने रेखांकन तयार करण्याचे आदेश असल्याने मूळ मालकांना कागदोपत्री प्रक्रियेचा अवलंब करायचा होता. मात्र, या काळात मे. कुबेर लँड डेव्हलपर्सचे मालक प्रकाश संचेती यांचे निधन झाले होते. याचा फायदा घेऊन कुबेर फर्ममधील एकूण १२ भागीदारांनी एकत्र येऊन यातील कमला बजाज यांच्या नावावर जीपीए तयार केला व ही संपूर्ण प्रक्रिया करण्याचे अधिकार दिले. हे अधिकार देत असताना अगोदर ज्यांना प्लॉट विकले होते त्यांची संमती घेणे बंधनकारक होते. मात्र, असे काही न करता बोगस दस्तऐवज तयार करून परस्पर सिडकोकडून नव्या रेखांकनाला परवानगी घेतली व संपादित झालेल्या २५ टक्के जमिनीचा १ कोटी १७ लाखांचा मोबदलाही उचलला. विशेष म्हणजे या बोगस दस्तऐवजात जुन्या मालकांच्या सह्या आहेत. त्यात कैलाश पुंगळे यांच्या सहीचाही समावेश आहे. मी मात्र अशा कोणत्याच कागदपत्रांवर सही केलेली नसल्याचे पुंगळे यांचे म्हणणे आहे. असे काही होत आहे हेही मला माहिती नसल्याचे ते म्हणतात. वरील १२ भागीदारांनी नंतर या बोगस जीपीएच्या आधारे सिडकोकडून नवीन रेखांकन व भूसंपादनाचे पैसे उचलून जमीनही दुसऱ्यांना विकली. ३८ वर्षांपूर्वीचे मालक असलेले पुंगळे यांना ना नवीन जागा देण्यात आली ना भूसंपादनाचे पैसे.

 

अटीही पूर्ण केल्या नाहीत
बजाज यांच्या नावे असलेल्या जीपीएमध्ये जुन्या प्लॉटधारकांच्या संमतीने सह्या घेऊन जीपीए तयार करण्यात आल्याचे नमूद आहे. सह्या बोगस असल्या तरी यात जुन्या प्लॉटधारकांना संपादित जमिनीचा मोबदला व उर्वरित जमिनीतून नव्याने तयार होणाऱ्या रेखांकनात प्लॉट दिले जातील असे नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही न करता या बारा जणांनी शासनासह प्लॉटधारकांची सपशेल फसवणूक केली असल्याची पुंगळे यांची तक्रार आहे.

 

जमीन विकली डेव्हलपरला
या सर्वांनी सुमारे ६२ हजार चौरस मीटर जागा ही विनय पुंडलिक चौधरी व गुरविंदरसिंग टुटेजा यांच्या चारुदीप डेव्हलपर्स कंपनीला दिली. ही जमीन डेव्हलप करून चौधरी आणि टुटेजा यांनी ती इतरांना विकली. यात पुंगळे यांच्या प्लॉट क्रमांक ९ चा समावेश आहे. हा प्लॉट अजूनही पुंगळे यांच्या नावावर असून त्याचा सातबाऱ्यावर उल्लेख आहे.

 

सहा महिने उलटले तरीही...
याप्रकरणी १० मे २०१७ रोजी पुंगळे यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना तक्रार केली होती. सुरुवातीला हा तपास वाळूज एमआयडीसीकडे  वर्ग केला गेला. पोलिस उपनिरीक्षक पी. एस. राजपूत यांच्याकडे देण्यात आला. तपास सुरू असताना भंगार घोटाळ्यात त्यांना निलंबित करण्यात आले. हा तपास त्यानंतर डी. एस. इवळ यांच्याकडे देण्यात आला. त्यांची जवाहरनगर पोलिस ठाण्यात बदली झाल्याने हा तपास पुन्हा पीआय ए. यू. साबळे यांच्याकडे वर्ग झाला. याप्रकरणी पुंगळे यांनी तीन महिने उलटूनही काहीच झाले नसल्याची तक्रार दिली. तेव्हा हा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. 

 

नेमकी भूमिका काय?
मूळ मालक प्रकाश संचेती हे वृद्ध असल्याने जमिनीचे संपूर्ण व्यवहार करण्याची जबाबदारी नीलेश जैन यांना देण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले. मात्र फर्मच्या वारसदार असलेल्या दस्तऐवजात त्यांचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय त्यांना संचेती यांनी अधिकृत काम करण्यासाठी कोणतेच अधिकार दिल्याचे दस्तऐवज नाहीत. तरीही जमिनीचा जीपीए करण्यापासून खरेदी-विक्री, डेव्हलपरसोबत केलेले कॉन्ट्रॅक्ट, सिडकोसोबत केलेला पत्रव्यवहार असो वा भूसंपादन प्रक्रिया, या संपूर्ण प्रकरणात त्यांचा समावेश आहे. म्हणून अधिकृतरीत्या त्यांचा या प्रकरणात नेमका काय रोल आहे याचा बोध होत नाही. आपण केवळ कामगार म्हणून काम केल्याचे ते सांगतात.

 

थेट सवाल

नीलेश जैन , कुबेर लँड डेव्हलपर्स, अधिकृत व्यवहारकर्ते

Q- तिसगाव येथील जमिनीबाबत तक्रार आहे...

A-  मध्यंतरी जमीनमालकाचे निधन झाल्याने कागदपत्रांच्या त्रुटींमुळे उशीर होत होता. त्यामुळे तक्रारी असू शकतात.

 

Q-  सिडकोच्या आदेशानंतर तयार केलेला जीपीए बनावट असल्याचे सांगितले जात आहे...
A-  मला सांगता येणार नाही. कारण हा जीपीए काकांनी तयार केला होता.
 

Q- सिडकोमध्ये जीपीए तयार करण्यापासून डेव्हलपमेंट अॅग्रिमेंट होईपर्यंत सर्व कागदपत्रे आपल्या नावाने दाखल करून परवानग्या मिळवल्या आहेत. आपला या प्रकरणाशी नेमका काय संबध?
A-  काकांचे वय अधिक असल्याने त्यांच्याकडून कामे होत नव्हती. मी केवळ कायदेशीर कामे करत होतो. एवढाच माझा संबंध आहे.
Q-  जुन्या जमीन मालकांच्या भूसंपादनापोटी दिलेली रक्कमही अद्याप मिळालेली नाही..
A-  मला सांगता येणार नाही. परंतु सिडको जेव्हा पर्यायी जागा देईल तेव्हा जुन्या मालकांना प्लॉट दिले जाणार असल्याची माहिती आहे.
Q-  ३८ वर्षांपूर्वीच्या मालकांना डावलून दुसऱ्यांना जमीन का विकली?
A-  याला मूळ मालक जबाबदार आहेत, मी नाही. त्यांच्याशी संपर्क करा.

 

या प्रोसेसशी संबंध नाही
मूळ मालकांनी आधी विक्री केलेल्या जमीनमालकांकडून संमती घेऊन सिडकोकडून नवीन रेखांकन मंजूर करून घेतले आहे. यानंतर आम्ही २००६ मध्ये उपलब्ध जमीन डेव्हलपमेंट अॅग्रिमेंट केले. त्यामुळे आधीच्या प्रोसेसशी आमचा संबंध नाही. आम्ही सर्व कामे रीतसर मार्गाने केली आहेत.
- विनय चौधरी, डेव्हलपर

 

...तर तो गुन्हा ठरतो
सिडको अधिक्षेत्रात २५ टक्के जमीन ही विकास आराखड्यासाठी अधिग्रहित केली गेली. या बदल्यात सिडकोने मूळ मालकाला भूसंपादन करुन रीतसर पैसे दिले आहेत. अतिरिक्त जमीन संपादित करण्याचा अपवादात्मक विषय असतो, मात्र लगेचच त्यांना पर्यायी जागा दिली जाते. जर अगोदर कुणी जमीनमालक असेल तर त्याला उर्वरित ७५ टक्के जमिनीत हिस्सा देणे मूळ मालकाला बंधनकारक असते. अन्यथा तो गुन्हा ठरतो.
- अभिजित पवार, टाऊन प्लॉनिंग, सिडको

 

माहिती घेऊन सांगतो
या प्रकरणाबाबत विशेष सांगता येणार नाही. तरीही सध्या हे प्रकरण निकाली निघाले की अजूनही त्याचा तपास सुरू आहे हे माहिती घेऊन सांगतो. 
-ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशन

 

 पुढील स्‍लाइडवर वाचा, डीबी स्टारने उपस्थित केलेले प्रश्न...

 

बातम्या आणखी आहेत...