आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी; वैद्यकीय क्षेत्राची मान उंचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वर्षभरापूर्वी औरंगाबाद शहरात हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले होते. यकृताचे प्रत्यारोपण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने औरंगाबाद शहर वैद्यकीय उपचारांत परिपूर्ण ठरेल, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. शुक्रवारी ठाकरेनगर येथील दिनेश आसावा यांंना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला अन् त्यांच्या यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. आता शहरात उच्च दर्जाच्या उपचारासोबतच प्रत्येक अवयवाचे प्रत्यारोपणही सहज शक्य झाल्याने औरंगाबादच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 


आसावा यांना पत्नी सावित्री, सोमेश्वर, शैलेश आणि पवन ही तीन मुले आणि अनुराधा, प्रज्ञा, स्नेहल या सुना असून सर्व जण सीए आहेत. ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान करता येते, याची त्यांना कल्पना होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजता वडील ब्रेनडेड झाल्याचे कळताच त्यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ब्रेनडेड समितीने तपासणी केली. यानंतर आसावा यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. दरम्यान, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना ब्रेनडेडची माहिती देण्यात आली. मुंबई-पुण्यासह देशातील सर्व प्रत्यारोपण करत असलेल्या रुग्णालयांना कळवण्यात आले. हृदय चेन्नईला पाठवण्यासाठी हालचाली झाल्या. मात्र, ते शक्य झाले नाही. शहरातील एका खासगी रुग्णालयात मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण झाले. तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. 

 

हृदय स्वीकारणारा रुग्ण मिळाला नाही 
देशातील प्रत्यारोपण करत असलेल्या रुग्णालयांना अवयव उपलब्धतेची माहिती दिली गेली. कुटुंबाची हृदय दानाचीही इच्छा होती. हृदय चेन्नईला पाठवण्यासाठी हालचाली होत्या. मात्र, हृदय स्वीकारणारा रुग्णच मिळाला नाही.


१० वर्षांपूर्वी ब्रेन क्वाइलिंगची शस्त्रक्रिया 
आसावा यांच्यावर १० वर्षांपूर्वी पुण्यात ब्रेन क्वाइलिंगची शस्त्रक्रिया झाली होती. ज्याप्रमाणे हृदयाच्या रक्तवाहिनीत ब्लॉक आल्याने हृदयविकाराचा झटका येतो आणि मग अँजिओप्लास्टी करून त्यात स्टेंट टाकून अडथळा दूर करावा लागतो, त्याचप्रमाणे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अडथळा निर्माण झाल्याने ही शस्त्रक्रिया करावी लागली होती. मेंदूत टाकलेल्या स्टेंटची क्षमता १० वर्षांची होती. सहा महिन्यांपूर्वीच आसावा यांची तपासणी करण्यात आली होती. 


रक्कम परत देऊ 
झेडटीसीसीच्या नियमांनुसार ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुढील सर्व खर्च झेडटीसीसी उचलते. बजाज रुग्णालयाने रुग्णाच्या कुटुंबीयांकडून खर्च घेतला असेल तर ते नियमबाह्य आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही रुग्णालयाला पैसे देऊ. त्यांनी ते लगेच नातेवाइकांना द्यावेत. 
-डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती 


कुटुंबासह पोर्ट ब्लेअरला जाणार होते 
आसावायांची मुले, सुना अासावा ब्रदर्स ही अकादमी चालवतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्यांत अंदमान, निकोबार, पोर्ट ब्लेअर येथे पर्यटनाला जाण्याचा कुटुंबाचा बेत होता. त्यानुसार १२ जणांचे कुटुंब सहलीवर जाणार होते. 

बातम्या आणखी आहेत...