आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान मेहदी चालवतो हर्सूल तुरुंगातून गँग! गुन्ह्यांची कबुली गँगचे सदस्य पोलिसांचे पंटर?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सलीम कुरेशीसह सहा खून करून हर्सूल कारागृहात मोक्काखाली शिक्षा भोगणारा सुपारी किलर इम्रान मेहदी हा कारागृहातून गँग चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या गँगमधील चौघांना मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याखाली २७ जूनला उस्मानपु-यात गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपींशी त्याचे नेमके काय संबंध आहेत, याची पडताळणी केली जाईल, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे यांनी सांगितले.

शहरात मंगळसूत्र चो-या पांढ-या रंगाच्या अपाचे गाडीवरून होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. मंगळसूत्र चोर उस्मानपु-यातील वॉकिंग प्लाझाजवळ असल्याची माहिती २७ जून रोजी खब-याकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. यातील दोन आरोपी घटनास्थळीच पांढ-या रंगाच्या दुचाकीजवळ असताना पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले. हातातून निसटलेल्या अन्य दोन आरोपींना पाठलाग करून पकडले. शेख शहाजद शेख शमीम (३१, रा. सादातनगर), इम्रान सैफुद्दीन शेख ऊर्फ सुलतान (३५, रा. नवी मुंबई, वाशी, ह. मु. सादातनगर, औरंगाबाद), शेख वाजेद शेख मकसूद ऊर्फ टिपू (२१, रा. विजयनगर) आणि शेख इरफान शेख लाल (२०, रा. बडी मशीदजवळ, गारखेडा) अशी या आरोपींची नावे आहेत. चौकशीत त्यांनी उस्मानपुरा, छावणी, जवाहरनगर भागातून मंगळसूत्रे चोरल्याचे कबूल केले असून ते सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. सुलतानवर तीन खुनांचे, तर शहजादवर एका खुनाचा गुन्हा दाखल आहे. वाजेद ऊर्फ टिपू याच्यावर चोरी व जबरी चोरीचे ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून ओळखपरेडनंतर पुन्हा त्यांची पोलिस कोठडी घेतली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे यांनी दिली. आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत आवारे, मच्छिंद्र ससाणे, सतीश साळवे, मिलिंद इप्पर, भाऊलाल चव्हाण, लाला पठाण, गोविंद पचरंडे यांनी केली.

बॉसला भेटण्यासाठी केली मंगळसूत्र चोरी
या आरोपींपैकी सैफुद्दीन ऊर्फ सुलतान हा मेहदीचा खास माणूस आहे. तो त्याच्याकडे कामाला होता. तीन खुनांमध्ये तो सहभागी असल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. मेहदीला अटक झाली त्या वेळी सुलतानदेखील अटकेत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला. पुन्हा आपल्या बॉसला भेटायचे म्हणून त्याने मंगळसूत्र चोरी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे मंगळसूत्र चोरीचा कट रचला गेला त्या वेळी एका पोलिसाचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. शहजाद, वाजेद ऊर्फ टिपू आणि इरफान हे सगळे मेहदीला कारागृहात भेटले, तेथेच त्यांची मैत्री झाली. सुलतान आणि शहजाद हे नेहमी मेहदीला भेटण्यासाठी कारागृहात जात. त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारत, असे समोर आले. त्यामुळे कारगृहात बसून मेहदी गँग चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. शहजाद आणि सुलतान हे दोघे मुंबईचे आहेत. तेथेही त्यांच्यावर गुन्हे आहेत. मेहदीदेखील मुंबईतील अंडरवर्ल्ड गँगचा सदस्य होता. मुंबईतील कारागृहातदेखील या तिघांनी एकत्र शिक्षा भोगल्याचे कळते.

कर्मचा-याचा सहभाग असल्यास कारवाई
अनेक वेळा गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी खब-या म्हणून अशा लोकांची मदत घेतात. मात्र, गुन्हेगारासोबत मैत्री असणे चुकीचेच आहे. या प्रकरणात कर्मचारी सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
बाबाराव मुसळे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
छायाचित्र : सुपारी किलर इम्रान मेहदी
बातम्या आणखी आहेत...