आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत सुविधा द्या, मग कॅशलेसचे बोला; डीजीधन कार्यशाळेत आ. इम्तियाज यांनी खडसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नाेटाबंदीबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी याचे दूरगामी परिणाम दिसणार आहेत, फायदाही होईल. मात्र, नोटाबंदीनंतर कॅशलेसच्या मागे लागलेल्या सरकारने आधी यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवणे आवश्यक अाहे. आधी सुविधा पुरवा, मगच नोटाबंदीबाबत बोला, असे खडे बोल आमदार इम्तियाज जलील यांनी सुनावले. 

कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी, त्याबाबत प्रबोधन करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे (निलिट) प्राध्यापक, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महसूल प्रबोधिनीत झालेल्या या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 

व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, उपाध्यक्ष सरदार हरिसिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे (निलिट) कार्यकारी संचालक डॉ. संजीवकुमार गुप्ता यांची उपस्थिती होती. 

आ. इम्तियाज जलील म्हणाले, कॅशलेसमुळे मोठ्या प्रमाणात कार्ड पेमेंटचा वापर होत आहे. मात्र, नागरिकांनी व्हिसा, मास्टर कार्डचा वापर करता रुपे कार्डचा वापर करावा. व्हिसा आणि मास्टर कार्डला कमिशन जाते. मात्र, भारतीय रुपे कार्डामुळे भारताचा फायदा होतो. यामुळे रुपेचा वापर वाढायला हवा. नोटाबंदीकडे दूरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणून पाहिले जाते. याचा निश्चितच फायदा होणार आहे. सरकार कॅशलेसचा प्रचार करत आहे. मात्र, यासाठी अजूनही पुरेशा सुविधा नाहीत. त्या उपलब्ध होण्याची गरज आहे. डिजिटल पेमेंटच्या कार्यशाळेला मोजकेच लोक आले होते. ही कमी संख्या विचार करण्यास भाग पाडणारी असल्याचे ते म्हणाले. खासदार खैरे यांनी निलिटच्या कार्यशाळेचे कौतुक केले. केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी हा निर्णय चांगल्या पद्धतीने राबवून घेतल्याचे सांगितले. 

कॅशलेसबाबत मार्गदर्शन 
निलिटचेकार्यकारी संचालक डॉ. संजीवकुमार गुप्ता म्हणाले, कॅशलेसच्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी आपण स्वतःची ‘रुपे कार्ड सिस्टिम’ तयार केली आहे. अशा प्रकारच्या व्यवहारासाठी स्वतःची सिस्टिम असणारा भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. 

मिलिंद क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. बँक ऑफ महाराष्ट्रचे किरण परदेशी आणि यूडीआयचे प्रतिनिधी यांनीही मार्गदर्शन केले. कॅशलेसबाबत संभ्रम दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, भीम अॅप, डिजिटल पेमेंट, मोबाइल बॅँकिंग याची माहिती तसेच कॅशलेस व्यवहार घ्यावयाच्या काळजीबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...