आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In 5 Years 75 % Purchasing Of Defense Will Be In India

पाच वर्षांत संरक्षण क्षेत्रातील ७०% खरेदी देशातच; दहा वर्षांत ८५ टक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या पाच वर्षांत संरक्षण क्षेत्रातील ७० टक्के खरेदी भारतातूनच केली जाईल. मेक इन इंडियाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्याचे मिशन आहे. दहा वर्षांत ही खरेदी ८५ टक्क्यांवर नेली जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी औरंगाबादेत सांगितले.

वाळूज एमआयडीसीत शुक्रवारी मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सेंटर फॉर एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘मराठवाडा डेस्टिनेशन फॉर मेक इन इंडिया’ प्रदर्शनाचे उद्घाटनही झाले. त्यास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार राजकुमार धूत, चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. ‘माझा चष्मा दोन्ही बाजूंनी वेगळा होऊन जोडला जातो. हा मेक इन इंडिया चष्मा आहे’ असे सांगत पर्रीकर म्हणाले की, गुणवत्ता, संख्यात्मक आणि कौशल्यपूर्ण विकासातून ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे. आता संरक्षण क्षेत्राला मेक इंडियात प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या संरक्षण सामग्रीतील ७० टक्के खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू आहे. अर्थात मानसिकता एका रात्रीत बदलत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज देशाला कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. घाण काढायची तर घाणीत उतरावे लागते. मात्र, वितभर उतरावे लागेल असे वाटत असताना कंबरेपर्यत उतरावे लागत आहे. परंतु, ही घाण कोणी केली ते विचारू नका. मेक इन इंडियाच्या यशस्वितेसाठी सरकारी कारभारात कार्पोरेट कार्यपद्धती येणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

मी तोमर नाही
सूत्रसंचालक मुकुंद कुलकर्णी यांनी पर्रीकर यांचा परिचय देतांना ते एम.टेक. असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर मी एम.टेक.चे केवळ शिक्षण घेतले आहे. पदवी घेतलेली नाही. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही एम.टेक. असल्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मी तोमर नाही, असा खुलासा केला.

शांततेचे दाखले किती
४० वर्षात युद्ध लढलो नाही त्यामुळे लष्कराचे महत्त्व कमी जाणवत असल्याचे विधान पर्रीकरांनी केले होते. तोच संदर्भ देत ते म्हणाले की, ४ जून रोजी म्यानमारमधील कारवाईत आमचे सैनिक मारल्यानंतर आम्ही काय करू शकतो हे दाखवून दिले. भारत देश शांततेचा पुरस्कार करणारा असल्याचे आणखी किती दिवस सांगत राहणार आणि सहन करणार? रामानेदेखील लंकेवर विजय मिळवल्यानंतर स्वत: राज्य केले नाही. ते बिभीषणाच्या हवाली केले.