औरंगाबाद - विद्यापीठातील संघटनांच्या शह-काटशहामुळे प्रभारी कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट यांनीही राजीनामा दिला असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, तत्कालीन प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश गायकवाड यांच्यावरील गुणांच्या हेराफेरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समितीही नेमण्यात येत असल्याची घोषणाही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.
डॉ. शिरसाटांनीही पद सोडले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रकाच्या नेमणुकीसंदर्भातील वाद वाढत गेल्याने बुधवारी (२१ जानेवारी) व्यवस्थापन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात या वादावर तोडगा काढण्यात आला. मात्र, या वादाला कंटाळून डॉ. महेंद्र शिरसाट यांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पदावर राहू कसे ?
ज्येष्ठसंशोधक डॉ. महेंद्र शिरसाट यांनी कुलगुरूंना २० जानेवारीला पाठवलेल्या राजीनाम्यात संवेदनशील भावना व्यक्त केल्या आहेत. "आपण विश्वास टाकला मात्र माझ्या नियुक्तीने काही जण नाखुश आहेत. त्यांनी आंदोलनांचे सत्र सुरू केले आहे. अशा स्थितीत शैक्षणिक वातावरण चांगले राहावे अशी माझी इच्छा आहे. तसेच आपण अडचणीत राहून कार्यभार चालवावा असेही आपल्याला वाटत नाही. त्यामुळे राजीनाम्याचा स्वीकार करावा, अशी विनंती केली.
डॉ. नेटकेंचे पारडे जड
प्रशासनातएकूण उपकुलसचिव आहेत. त्यापैकी दोघांकडेच पीएचडीची शैक्षणिक अर्हता आहे. डॉ. गणेश मंझा आणि डॉ. डी. एम. नेटके अशी त्यांची नावे आहेत. शिवाय पहिले दोन ज्येष्ठ उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझा आणि गणेश मंझा सख्खे भाऊ आहेत. उर्वरितांमध्ये विष्णू कऱ्हाळे, दिलीप भरड आणि विजय मोरे यांच्याकडे पीएचडी नाही. डॉ. गणेश मंझा कार्यक्षम आहेत मात्र त्यांच्या नावाला अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे डॉ. नेटके यांचे पारडे जड मानले जात आहे.
"त्या' चौकशी समितीच्या अध्यक्षपदी निंबाळकर
विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी मुलाच्या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपांच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बुधवारी दिली.
आपल्या मुलासाठी पदाचा गैरवापर करून कॅप्टन गायकवाड यांनी दोन वेळा गुणवाढ केल्याचा आरोप त्यांच्यावर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला. त्यामुळे गायकवाड यांचा पदभार काढून घेण्यात आला होता. मात्र त्याचे कारण जाहीर झाले नव्हते. ते कारण 'दिव्य मराठी'ने उजेडात आनला .
नव्या नियुक्तीपर्यंत पदभार डॉ. के.व्ही. काळे यांना सोपविण्यात आला आहे.
असा निघाला तोडगा : परीक्षा नियंत्रकाच्या नेमणुकीसाठी आधीच्याच सात अर्जांमधून पात्र व्यक्तीची निवड शक्य होईल. तोपर्यंत डॉ. वाल्मीक सरवदे प्रभारी म्हणून काम पाहतील. कुलसचिव पदाचा कार्यभार पात्र उपकुलसचिवांकडे दिला जाईल. शिवाय लगेच जाहिरात काढून हे पदही भरले जाईल. या व्यवस्थेवर व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या बाजूने उभे असून त्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
१५ जानेवारीला कुलगुरूंच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांना हटवून दोन्ही पदांचा खांदेपालट करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर गायकवाड यांना तातडीने कार्यमुक्त करून कुलगुरूंनी डॉ. शिरसाट यांच्याकडे कुलसचिव तर डॉ. सरवदे यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाचा कार्यभार दिला होता. त्यानंतर बामुक्टा मुप्टा संघटनांनी दोन्ही नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी १९ जानेवारीला व्यवस्थापन परिषद सभागृहात ‘ठिय्या’ मांडला. त्या वेळी प्राध्यापकांनी डॉ. शिरसाट यांच्यावर अश्लाघ्य आरोप केले होते. नॅक समितीत समावेश असल्यामुळे मुंबई आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर असलेल्या डॉ. शिरसाट यांना या संवादाची इत्थंभूत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्याच दिवशीच्या तारखेचा उल्लेख करून कुलगुरूंना मंगळवारी (२० जानेवारी) राजीनामा कर्नाटकातूनच मेल केला होता.
असाआहे, शासन निर्णय : उच्चतंत्रशिक्षण विभागाने १५ मार्च २०१३ रोजी अकृषी विद्यापीठांसाठी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार अनेकदा कुलगुरू शिक्षकांकडे कार्यभार देतात, मात्र त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्यामुळे प्रशासनात अडचणी निर्माण होतात. म्हणून वित्त लेखाधिकाऱ्यांचा पदभार शक्य असल्यास उपवित्त लेखाधिकाऱ्यांना द्यावा, कुलसचिवांचा अतिरिक्त कार्यभार सेवा ज्येष्ठ पात्र उपकुलसचिवांना तर परीक्षा नियंत्रकाचाही तात्पुरता कार्यभार उपकुलसचिवांकडे द्यावा, असे या शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कुलसचिवांचे कार्यकाळ
१.डॉ.डी. आर. माने-२० डिसेंबर २०११ ते जानेवारी २०१५ २.डॉ.सुरेश गायकवाड-६ ते १५ जानेवारी २०१५ (१० दिवस) ३.डॉ.महेंद्र शिरसाट-१५ जानेवारी ते २१ जानेवारी (४ दिवस) ४.डॉ.के. व्ही. काळे-२१ जानेवारी ते नवे कुलसचिव येईपर्यंत.