आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांना केंद्रस्थानी माना, मंदी पळवा!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतासारख्या शेतीप्रधान देशात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असते. देशाच्या आर्थिक साखळीतील शेतकरी अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्र केंद्रस्थानी ठेवून बँकांनी योजना आखल्या तर जागतिक मंदीतही भारत सहज तरून जाईल, असा विश्वास स्टेट बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक (मुंबई-गोवा विभाग) जे. एन. मिश्रा यांनी व्यक्त केला.
एसबीआयच्या देवळाई शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते शहरात आले असता ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला. सर्वांच्याच उरात धडकी भरवणा-या आर्थिक मंदीवर उपाय काय या प्रश्नावर त्यांनी भारतासमोर तरी वरील पर्याय असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, शेतक-यांना केंद्रबिंदू मानून बँकांनी विविध योजना तयार करण्याची गरज आहे. देशातील शेवटच्या माणसापर्यंत बचतीचे महत्त्व पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठीच हे कार्य आम्ही मिशन म्हणून हाती घेतले असून ग्रामीण भागात जास्तीत जास्त शाखा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. देशातील सर्व आर्थिक व्यवहार बँकिंग क्षेत्राशी निगडित असतात. आर्थिक क्षेत्रातील चढ-उतार हा व्यवहाराचा एक भाग आहे. उद्योगविश्व आणि बँकांनी एकत्र काम केल्यास कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे सहज शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बँकेने केवळ आर्थिक व्यवहार करण्याचा काळ आता गेला आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबवणेसुद्धा आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अद्ययावत सुविधांवर भर
मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांत एक हजार एटीएम आम्ही सुरू करणार आहोत. याचबरोबर मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग अशा अद्ययावत सुविधांची ग्राहकांनी ओळख करून घेणे आवश्यक आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर ग्राहकोपयोगी उपक्रम बँकांनी सुरू करणे अपेक्षित आहे.
बहुतांश उद्योगधंद्यांचे भवितव्य शेतीवर
भारतासारख्या शेतीप्रधान देशात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असते. देशाच्या आर्थिक साखळीतील शेतकरी अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून नवनवीन उपक्रम, कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याकडे बँकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांश उद्योगधंद्यांचे भवितव्य शेतक-यांवर, पावसावर, पीकपाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे बँकांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.