आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकट परिस्थितीतही मानसिंग ताठच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर- कन्नड तालुक्यातील भिलदरी येथील सधन शेतकर्‍याने गतवर्षीच्या भीषण दुष्काळात जनावरांना मोफत पाणी पुरवून गावातील शेतकर्‍यांची जनावरे विक्री करण्यापासून रोखली. आपल्या शेतात मजुरी करणार्‍या मजुरांची मजुरी देण्यात कधीही दिरंगाई न करण्याचा पायंडा परिसरात मानसिंग गोठवाल यांनी बिकट परिस्थितीतही कायम ठेवल्याची चर्चा बाजाराच्या दिवशी गावात होती.
पिशोर येथून जवळच असलेल्या भिलदरी येथील मानसिंग छोटूराम गोठवाल यांचा गावात आदर्श आहे. यंदा त्यांनी मोठय़ा प्रमाणावर पिशोर येथील नामांकित व्यापार्‍याला कापूस विक्री केला. पैसे व्यापार्‍याकडे जमा होते. बाजाराच्या दिवशी व्यापार्‍याकडून पैसे घेऊन मजुरांचे पैसे चुकते करू या आशेवर ते होते. मानसिंग यांनी बाजाराच्या आदल्या दिवशी व्यापार्‍याकडे कापसाचे पैसे मागितले. व्यापार्‍याने देण्यास टाळाटाळ करत काही दिवस थांबण्यास सांगितले. त्यामुळे मानसिंग हतबल झाले. काय करावे या विवंचनेत असताना त्यांनी थेट मजुरांचे पैसे चुकवण्यासाठी वडिलोपाजिर्त कानातील पाच ग्रॅमचे दागिने विक्री करत बाजाराच्या दिवशी पैसे चुकते केले.
मला समाधान आहे
मागील वर्षी दुष्काळात गावातील शेतकरी जनावरे विक्रीसाठी निघाली होती. त्या वेळी आम्ही स्वखर्चातून जनावरांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला. याचे मनस्वी समाधान आहे. आज व्यापार्‍याने दगा दिल्याने माझ्यावर बिकट परिस्थिती ओढवली होती, परंतु वडिलोपाजिर्त दागिने विक्री करून मजुरांचे पैसे वेळेत चुकते केले याचे समाधान आहे.’’ मानसिंग गोठवाल, शेतकरी
बाजारपेठेत चर्चेचा विषय
मानसिंग यांनी पिशोरच्या नामांकित व्यापार्‍याला काही दिवसांपूर्वी कापूस व अद्रक विक्री केली होती. त्याचे सुमारे 55 हजार रुपये व्यापार्‍याकडून मिळणार होते व 15 ते 16 मजुरांच्या मजुरीपोटी 25 हजार रुपये देणे बाकी होते. व्यापार्‍याकडून वेळेत पैसे आले नसले तरी मानसिंग यांनी स्वत:कडील वडिलोपाजिर्त पाच ग्रॅमचे दागिनी विक्री करत काही स्वत:जवळचे पैसे टाकून मजुरांचे 25 हजार रुपये चुकते केले. बिकट परिस्थितीतही मानसिंग यांनी केलेली मात बाजारात चर्चेचा विषय होती.