आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या कुशीमध्ये वावरतोय खरा पक्षिमित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वन्यप्राणी,पक्ष्यांचे जीवन आणि त्यांचे बारकावे अनेक लेखकांनी लिखाणाच्या माध्यमातून मांडल्याने ते सर्वपरिचित झाले आहेत. परंतु जायकवाडी धरणाच्या कुशीतही असाच एक निसर्ग पक्षिमित्र वावरत आहे. शाळा काय असते हे त्याला माहिती नाही, पण बालपणापासून केवळ निरीक्षण करून त्याने धरण परिसरातील हजारो पक्ष्यांची माहिती करून घेतली आहे. एखाद्या पक्ष्याचा फोटो जरी दाखवला तरी त्याच्या प्रत्येक हालचालीबद्दल तो इत्थंभूत माहिती देतो. धरण परिसरात आढळणाऱ्या जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्याने अनेक पक्ष्यांना जीवदान दिले आहे.

खरा पक्षिमित्र असलेल्या अठरा वर्षांच्या या मुलाचे नाव अर्जुन फत्तू कुचे. तो कधीच शाळेत गेला नाही. अख्खे कुटुंब मासेमारीवर गुजराण करते. पैठणमधील खुल्या कारागृहाच्या भागात धरणाच्या किनाऱ्यावर त्याची छोटीशी झोपडी. अर्जुनला पाच भाऊ आहेत. तो सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गुरे चरायला सोडून पक्ष्यांच्या किलबिलाटात रमतो. धरण परिसरात जखमी पक्षी दिसला तर त्याच्यावर उपचार करतो. त्याचा खिसा म्हणजे प्रथमोपचार पेटी आहे. त्यात कापडी पट्टी, मलम असतो. जास्त जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी तो औरंगाबादमधील डॉ. किशोर पाठक यांची मदत घेतो. त्याचे कार्य पाहून पाठक तो बोलवेल तेव्हा जाऊन पक्ष्यांवर उपचार करतात. आतापर्यंत अर्जुनने व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर, पर्पल मोर हेन, पेंटेड स्ट्रोक, डोमेसेल क्रेन आदी पक्ष्यांना जीवदान दिल्याचे सांगितले.

आकडे,चिन्हांद्वारे ओळख : अर्जुनला लिहिता-वाचता येत नाही. पण त्याने स्वत:ची सांकेतिक भाषा तयार केली आहे. वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकारांची नावे आकडे आणि चिन्हांवर त्याने मोबाइलमध्ये सेव्ह केली आहेत. उदा. हॅशटॅग (#) म्हणजे योगेन कुलकर्णी, पर्सेंटेज (%) म्हणजे कर्नल राऊत, म्हणजे बैजू पाटील आदी. नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक वन्यजीव छायाचित्रकारांना चांगले फोटो काढण्यासाठी अर्जुन उत्तम स्पॉट सुचवतो. या स्पॉटवर फोटो काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याचे बैजू पाटील यांनी सांगितले. पक्षीनिरीक्षणासाठी पाटील यांनी त्याला महागडी दुर्बिणही दिली आहे.
स्वत:चा शब्दकोश बनवला
प्रख्यात वन्यजीव अभ्यासकाप्रमाणे पक्ष्यांबद्दलची माहिती अर्जुनला आहे. धरण परिसरात किती प्रकारचे पक्षी आहेत ते अंडी घालतात त्यांची पिलं किती ही सर्व माहिती चुटकीसरशी तो सांगतो. शिक्षण नसल्यामुळे पक्ष्यांची शास्त्रीय नावे त्याला माहिती नाहीत, पण त्याने स्वत:चा शब्दकोश तयार केला आहे. उदा. तो फ्लेमिंगोला केमिंगो म्हणतो, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशरला पोटाजवळ ढवळ, पाठीवर नीळ आणि लाल चोच असणारा पक्षी म्हणतो. एखाद्या दुर्मिळ पक्ष्याचे छायाचित्र काढायचे असल्यास वन्यजीव छायाचित्रकार त्याला पुस्तकातील चित्रे दाखवून संबंधित पक्ष्याबद्दल माहिती विचारतात आणि तो सर्व माहिती सांगतो.
छायाचित्र: गुरे चारताना पक्षी निरीक्षण करताना अर्जुन कुचे.