आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकाच्या कुटुंबीयांना सासरच्यांकडून धमक्या, आरोपी कालिदासची न्यायालयीन कोठडीत रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराला हेलावून सोडणाऱ्या रसिका आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून तक्रार मागे घ्या, पोलिसांचा पाठपुरावा करू नका यासाठी धमक्या येत असल्याची तक्रार रसिकाचे वडील शिवकरण होळंबे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. चार दिवसांपूर्वी सातारा परिसरातील रसिका फड (३२) हिने पती आणि सासरच्या त्रासला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पती कालिदास फड याला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, रसिकाचे वडील आणि काका यांना परभणी येथील काही राजकीय नेत्यांचे फोन आल्याचे सांगितले. काही लोक घरी येऊन गेले. रसिकाची सात वर्षांची मुलगी जिगीषा वाचली असून ती एकमेव साक्षीदार आहे. तिची काळजी घ्या, असा धमकीवजा सल्ला त्यांनी दिला. तक्रारीनंतर पोलिस आयुक्तांनी होळंबे कुटुंबीयांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणातील तीन आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, रसिकाला कालिदासपासून घटस्फोट हवा होता. यासाठी तिने तयारी केली होती. आपली व्यथा कागदावर मांडली होती. ही १३ पाने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. आठ वर्षांची व्यथा रसिकाने ३१ परिच्छेदांत मांडली आहे.
तिच्यावरच गुन्हा दाखल
मुलीला विहिरीत फेकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल रसिकावर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून हवालदार सुदाम जिजाबा दाभाडे यांनी तक्रार दिली आहे. १७ जून रोजी हा प्रकार घडला. दरम्यान, 7 वर्षांच्या या मुलीने विहिरीतील दोरीला पकडल्यामुळे तिचा जीव वाचला. तपास पोलिस उपनिरीक्षक बागुल करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...