आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Modern Age Saint Literature Still Relevant Sadanand More

संत साहित्य आधुनिक युगातही अबाधित - सदानंद मोरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संतांनी कायम सामान्यांच्या जगण्याच्या बाजूने लिहिले आहे. ते आधुनिकतेशीही तेवढ्याच प्रभावीपणे सांगड घालत. त्यामुळे संत साहित्य आधुनिक युगातही अबाधित राहणार असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक आणि ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.
मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात आयोजित व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रकाशक, साहित्यिक बाबा भांड, अर्चना मोहगावकर, केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर उपस्थित होते. मोरे म्हणाले की, १३०० ते १८०० शतकापर्यंत खऱ्या अर्थाने उत्कृष्ट मराठी साहित्याची निर्मिती झाली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांची शिक्षण व्यवस्था रुजवली. त्याचा साहित्यावर मोठा परिणाम झाला. ते साहित्य निर्माण होणे बरोबर होते. परंतु त्यानंतरचे साहित्य हे अनुकरणातून निर्माण झालेले आहे. संत साहित्य हे पूर्णपणे सामान्यांच्या गरजेतून निर्माण झाल्याने ते अजूनही टिकून आहे. मराठी माणसाच्या संपूर्ण जीवनशैलीवर संतांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत आपोआप संस्कार होत असत. परंतु आता कुटुंब व्यवस्थेचे विघटन होत आहे. अशा परिस्थितीत बालसंस्कार केंद्रांनी संतांचे साहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या वेळी भांड यांनीही मुलांना लिखाण, वाचनाची सवय लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रतिभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.