आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Name Of March Ending One And Half Crores Fraud Dislcose In Public Work Department

सार्वजनिक बांधकाम विभागात मार्च एंडींगच्या नावाखाली दीड कोटीची हेराफेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 31 मार्चचा दिवस म्हणजे सरकारी अधिकार्‍यांसाठी लॉटरीचा दिवस असतो. या दिवशी सर्वात जास्त चेक काढले जातात ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे. र्मजीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी अधिकारी धनादेशावरील रकमेत हेराफेरी करीत असल्याचे उघड झाले आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या नावाखाली आलेली रक्कम दुसर्‍या हेडवर खर्च करण्याचा प्रताप कार्यकारी अभियंत्यांनी केल्याचा आरोप काही ठेकेदारांनी निवेदनाद्वारे केला आहे.

केंद्र शासनाकडून तेराव्या वित्त आयोगाच्या कामासाठी 2012-13 या आर्थिक वर्षासाठी 5 कोटींचा निधी आला होता. या हेडखाली आलेल्या निधीचा वापर दुसर्‍या कामात करता येत नाही. असे असतानाही कार्यकारी अभियंता जी. एस. खाडे यांनी 3054 या दुसर्‍या हेडच्या कामासाठी वापरले. विशेष म्हणजे त्यांनी धनादेशावरील रक्कम तीन वेळेस खोडून त्यात बदल केला. या घोटाळ्यासंदर्भात ठेकेदार पी. एच. पाटील यांनी मुख्य अभियंता सी. पी.जोशी यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. कार्यकारी अभियंत्यांनी 85,50,880 चे बिल असताना 72 लाख 84 हजार 241 चा धनादेश तयार केला. यानंतर त्याच धनादेशावर खाडाखोड करून 59 लाख 24 हजार 121 आणि शेवटी 46 लाख 8 हजार 621 असे केले. दुसरे ठेकेदार बी. बी.लहानगे यांच्या 347637 या धनादेशावर 63,43,442 रक्कम असताना पुन्हा खाडाखोड करून 43,90,948 अशी हेराफेरी केली.

तेराव्या वित्त आयोगास पाच कोटींचा निधी आलेला असताना कार्यकारी अभियंता खाडे यांनी फुटकळ कामासाठी असलेल्या 3054 या हेडवर खर्च करण्याचा प्रताप केला आहे. धनादेशावर हेराफेरी करताना अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंत्यांची परवानगी घेण्यात न आल्याने कार्यकारी अभियंता व उप अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइलला प्रतिसाद दिला नाही. मात्र, अधीक्षक अभियंता हेमंत पगारे यांनी ठेकेदारांच्या तक्रारीबाबत माहिती दिली. संबंधित ठेकेदारांनी मुख्य अभियंत्यांकडे तक्रार केली असून त्यांच्या धनादेशावर झालेल्या खाडाखोडीच्या बदल्यात आपण त्यांना दुसरे धनादेश देण्याचे कळवले होते. मात्र, ठेकेदारांनी ताठर भूमिका घेत बिलाची संपूर्ण रक्कम देण्याचा आग्रह करीत आम्हालाच त्रास देणे सुरू केले.
एका हेडखाली आलेला निधी इतरत्र वापरता येत नाही. तसे झाले असल्यास चौकशी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
.. तर चौकशी
ज्या हेडसाठी निधी आला त्याच हेडवर खर्च करणे बंधनकारक आहे. मार्च एंडच्या नावाखाली काही हेराफेरी झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. ठेकेदारांना सुधारित धनादेश देण्याचे आम्ही कळवलेले आहे. सध्या त्यांना पूर्ण रक्कम देणे शक्य नसल्याने ठेकेदाराच अधिकार्‍यांना त्रास देत आहे. हेमंत पगारे, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी

धनादेशावर हेराफेरी
मर्जीतील ठेकेदारांसाठी कार्यकारी अभियंत्यांनी धनादेशावर जवळपास दीड कोटींची हेराफेरी केली. आमच्या हेडचा पैसा दुसर्‍या हेडवर खर्च करून घोटाळा केला आहे. मुख्य अभियंत्यांनी संबंधितावर कारवाई न केल्यास हे प्रकरण अँन्टीकरप्शन विभागाकडे सोपवणार आहे. पी. एच. पाटील, तक्रारदार ठेकेदार
झालेल्या कामांचीच बिले नोंदवली
तेराव्या वित्त आयोगाची जी कामे झाले त्याची नोंद मस्टरवर घेऊन बिले नोंदवली आहे. कामे तपासूनच ठेकेदारांची बिले पाठवण्यात आलेली आहेत. धनादेशावरील खाडाखोडीबाबत कार्यकारी अभियंताच उत्तर देऊ शकतात. के.टी. वाघ, कनिष्ठ अभियंता