औरंगाबाद: नोटाबंदीचा व्यावसायिकांनाच नव्हे, तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनाही जबर फटका बसला आहे. नोटांबदीमुळे शेतमालाला किंमत मिळत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. नोटाबंदीच्या विरोधात गुरुवारी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी ग्रामीण भागाचा आर्थिक कणा कसा मोडला याचे विस्तृत कथन केले. एका शेतकऱ्याने सांगितले की, शेतात लावलेल्या मिरच्या त्याने मजुरामार्फत सहाशे रुपये क्विंटल दराने तोडल्या. मात्र प्रत्यक्षात मिरचीला पाचशे रुपये क्विंटल भाव मिळाला.
त्यामुळे उत्पादन खर्च तर सोडाच, काढण्याचा खर्चही परवडला नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
मेहनतीने पिकवलेले मातीमोल विकले : शेतकरीमोर्चात पैठण, कन्नड, वैजापूरसह इतर तालुक्यांतील नागरिक, श्रमिक शेतकरी सहभागी झाले होते. या कष्टकरी वर्गाला नोटाबंदीच्या परिणामाबाबत विचारले असता प्रामुख्याने महिलांनी नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका करत आपल्या भावना तीव्रतेने मांडल्या.
तीन-चार महिन्यांत पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागल्याचे त्यांनी सांगितले. टोमॅटो तर दोन ते चार रुपये किलो अशा मातीमोल भावाने विकावे लागले. त्यामुळे शेतमाल विक्रीला आणणेही परवडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
- नोटाबंदीमुळे तुरीचाभाव तरी हमी भावाच्या खाली गेला आहे. कापूस साडेचार हजाराने विकावा लागला. मेहनत मातीमोल झाली.
- ज्ञानेश्वर जाधव, लिंबेजळगाव
- मिरच्या,टोमॅटो काढणेही परवडले नाही. नोटाबंदीमुळे पुढच्या वर्षभराचे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
-बिन्नाबाई ढोले, टेंभापुरी
- तीन वर्षे दुष्काळ होता. यावर्षी पाऊस चांगला झाला. मका पिकाचे चांगले उत्पादन होऊनही नोटाबंदीमुळे आर्थिक फटका बसला.
-प्रभाकर साबळे, शिवराई
- एकक्विंटल मिरच्या काढायला सहाशे रुपये लागले. विकल्यानंतर त्याला पाचशे रुपये भाव मिळाला. -पद्माभाई सुखासे, टेंभापुरी