आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी FOCUS : काश्मीर सीमेवर तीन वर्षांत १८६ जवान अतिरेक्यांचे बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जम्मू-काश्मिरातील उरीमध्ये लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे दहशतवादाचा मुद्दा देशभरात प्रचंड चर्चेत आहे. पाकिस्तानच्या अशा घातकी कारवायांमुळे सध्या संपूर्ण देशात रोषाचे वातावरण असून संतापलेल्या देशवासीयांकडून युद्धाची मागणी होऊ लागली आहे. पाककडून मागील अनेक वर्षांपासून अशा घटना वारंवार घडत आहेत.

गृहमंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१३ पासून आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर भागात तब्बल ७३८ वेळा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. लष्कर व दहशवाद्यांतील चकमकीत १८६ जवानांना प्राणाला मुकावे लागले, तर २५३ जखमी झाले आहेत. दरम्यान, सीमारेषेवर तैनात भारतीय जवानांनी केलेल्या धाडसी कारवायांमध्ये आतापर्यंत १४१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर, मागच्या वर्षी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका अतिरेक्याला तपास यंत्रणेने जिवंत पकडले होते.
६४ नागरिकांना गमवावे लागले प्राण : जम्मू आणि काश्मीर भागात झालेल्या घुसखोरी प्रकरणांत आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये २०१३ पासून आतापर्यंत ६४ नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय, यात सुमारे १८२ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. रोजच्या घातकी कारवायांमुळे या भागातील नागरिक दहशतीतच आयुष्य व्यतीत करत आहेत.
अतिरेकी घटनांत ४२ बळी, ३०७ जखमी
विविध दहशतवादी संघटनांकडून २०१३ पासून आतापर्यंत अनेकदा भारताच्या विविध शहरांमध्ये हल्ले करण्यात आले. देशात मागील तीन वर्षांत अशा एकूण ९ घटना घडल्या असून त्यात नागरिकांसह ४२ जवानांचे प्राण गेले, तर ३०७ जखमी झाले. हैदराबाद साखळी बॉम्बस्फोट, बंगळुरू, पाटणा व बोधगया बॉम्बस्फोट तसेच गुरुदासपूर आणि पठाणकोट हल्ले यातील काही प्रमुख घटना आहेत.
पकडलेला एकमेव अतिरेकी नावेद
५ ऑगस्ट रोजी जम्मू- काश्मिरातील उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्याच दरम्यान लष्कराने मोहंमद नावेद ऊर्फ कासीम या अतिरेक्याला जिवंत पकडले होते. आतापर्यंतच्या एकूण कारवायांमध्ये जिवंत पकडला गेलेला हा एकमेव अतिरेकी आहे.

२०१६ मध्ये घुसखोरीचे प्रमाण घटले, धोका कायम
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर परराष्ट्र धोरणात झालेला बदल दहशवादावर नियंत्रणासाठी बऱ्याच अंशी यशस्वी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानची होत असलेली नाचक्की आणि भारताकडून सुरू असलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा घुसखोरीचे प्रमाण कमी आहे. २०१३ मध्ये २७७, २०१४ मध्ये २२२ तर २०१४ मध्ये १२१ वेळा भारतीय सीमारेषेत घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. यंदा आतापर्यंत अशा ५१ घटना घडल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...