आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनामी जमिनी देवस्थानच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्ह्यातील इनामी जमिनी संबधित देवस्थानाच्या नावावर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. इनामी जमिनींचा देवस्थानाच्या नावावर फेर घेण्याच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरांची इनामी जमीन परस्पर नावावर करण्याचा प्रकार मागील वर्षी झाला होता. पूजा-यांनीच हे प्रकार केल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आणि त्यांनी महसूल विभागाला इनामी जमिनी तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कामाला सुरुवात केली, यासंदर्भात हरकती आणि सूचना तसेच कागदपत्रांची पूर्तता यांची तपासणी पूर्ण झाली असून या जमिनींचा मंदिरांच्या नावावर फेर घेण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात142 प्रकरणे - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मंदिरासाठी इनामी जमिनी देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शर्तभंग आणि मालकी हक्काची प्रकरणे आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर देवस्थानची जमीन इनामदार, पुजारी यांच्या नावावर केल्याचे 142 प्रकार घडले. यातील सात प्रकरणाचा निकाल लागला असून इतर प्रकरणे लवकरच निकाली लागणार आहे. सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील मंगरुळेश्वर देवस्थानची गट क्रमांक 225, मोढा बु. येथील गट क्रमांक 192 आणि 194 येथील जमीन अन्वी येथील विठ्ठल मंदिर देवस्थान यासोबत सोयगाव येथील श्रीराम मंदिराची गट क्रमांक 185 , तितूर येथील मारुती मंदिराची गट क्रमांक 171 , वरठाण गावातील बालाजी मंदिर गट क्रमांक 16 या गावामधील मंदिरांचे दावे-हरकती यांची छाननी करून मंदिरांच्या नावे फेर करण्यात आले आहेत.
दावे, हरकतीची कामे पूर्ण - याप्रकरणी दावे आणि हरकतींची नोंद घेण्यात आली आहे. इनामी जमिनींच्या मालकी हक्काविषयी आणि परस्पर जमिनी नावे करण्याच्या प्रकरणी तपास पूर्ण करण्यात आला आहे. याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल. - संभाजी आडकुणे, उपविभागीय अधिकारी