आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात मोदींनी अडवलेली नाल्याची वाट केली मोकळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्थळ : देवळाई चौक, गट क्रमांक १४०. हॉटेल प्रशांतच्या पुढे चावडा कॉम्प्लेक्सच्या समोर. श्रावणलाल मोदी नावाच्या सद््गृहस्थांची चारमजली इमारत. बाजूने जाणारा नाला बांधकामात येत असल्यामुळे त्याचा प्रवाह वळवून पुढे तो नष्ट करण्यात आला. प्रशासनाच्या वतीने साताऱ्यात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मोदी यांनी अडवलेला नाला मोकळा करून प्रवाह सुरळीत करण्यात आला. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. नाल्याचा प्रवाह मोकळा झाल्यानंतर मोदी यांचे बांधकाम वैध की अवैध याची तपासणी करण्यात येत आहे. बांधकाम अवैध असेल तर उद्या तेथे बुलडोझर चालवला जाईल, असे सातारा-देवळाई नगर परिषदेचे प्रशासक विजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मोदी यांनी बांधकाम करतानाच नाला अडवला होता. तशी तक्रार शेजाऱ्यांनी तत्कालीन ग्रामपंचायतीकडे केली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मात्र आता साताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर याकडे प्रशासनाचे लक्ष गेले. मोदी यांनी नाला अडवून पुढे त्याचा नैसर्गिक प्रवाहच नष्ट केला होता. त्यासाठी त्यांनी सिमेंटचा पुरेपूर वापर केला. त्यामुळे शिंदोन-भिंदोनकडून येणारे पाणी अलीकडे साचत होते. सोमवारी सकाळी प्रशासनाने याकडे लक्ष दिले. मोदी यांनी अडवलेला नाला प्रथम मोकळा करण्यात आल्यानंतर ड्रेनेजचे पाणी पुढे मोकळे वाहू लागले. मोदी यांचे बांधकामही अनधिकृत असल्याची तक्रार असून उद्या त्याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मोहिमेला देणार वेग : मंगळवारपासून मोहिमेला आणखी वेग दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळही वाढवण्यात आले असून अन्य सामग्रीही उपलब्ध होत असल्यामुळे उद्यापासून जास्तीची पथके अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी होतील. त्यामुळे एकाच दिवशी किमान चार ते पाच इमारती पाडल्या जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रविवारच्या आंदोलनाचा कारवाईवर परिणाम नाही

दरम्यान, प्रशासनाच्या या मोहिमेच्या विरोधात रविवारी नागरिकांनी आंदोलन केले. मात्र, त्याचा काहीही परिणाम या कारवाईवर सोमवारी झाला नाही. रविवारी पथकाने विसावा घेतला होता. सोमवारी ही मंडळी नव्या दमाने कामाला लागली. त्यांनी गट क्रमांक १४१ आणि १४२ येथील दोन अपार्टमेंटचे प्रत्येकी दोन मजले सोमवारी जमीनदोस्त केले. जाफर खान, शेख अमीन, अब्दुल मुख्तार, प्रतिमा गायकवाड यांच्या सदनिका आज जमीनदोस्त झाल्या. त्यांच्या अपार्टमेंटची जागा ६ हजार ७५० चौरस फुटांची होती अन् बांधकाम झाले होते २७ हजार चौरस फुटांचे. नलिनी पवन काळे व प्रीती संजय भंडारी यांनी बांधलेल्या दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये ६ हजार चौरस फुटांच्या जागेवर २५ हजार चौरस फुटांचे बांधकाम झाले होते. या दोन्हीही इमारतींचे वरील दोन मजले सोमवारी पाडण्यात आले.