आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईतही सुक्या मेव्याची खरेदी, मागील वर्षाच्या तुलनेत 10 ते 15 टक्के वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ईदनिमित्त शिरखुर्म्यासाठी लागणा-या सुक्या मेव्याची खरेदी यंदा महागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अनेक वस्तूंचे भाव दहा ते पंधरा टक्के वाढले असून खोब-याचे भाव मात्र 80 रुपयांवरून तब्बल 180 रुपयांवर गेले आहेत. शिवाय हाताने तयार केलेल्या शेवयाही महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
रमजान ईदचा मुख्य मेन्यू शिरखुर्मा असतो. यासाठी दूध आणि सुक्या मेव्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ईदच्या दिवशी नातेवाईक आणि मित्रमंडळींना शिरखुर्म्याची दावत दिली जाते. महागाईमुळे या वर्षी दुधासह सर्वच सुक्या मेव्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बदाम, काजू, पिस्ता, खोबरा, शेवया, टरबूज बी, चारोळी, खारीक आदींचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, रोशन गेटसह शहरात ठिकठिकाणी सुका मेवा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. लहान व्यापारी शहरभर फिरून हातगाडीवरून विक्री करीत आहेत. ईदसाठी वाढणारी मागणी लक्षात घेता मोठ्या व्यापा-यांनी एक महिना आधीच सुक्या मेव्याचा साठा करून ठेवला आहे. हैदराबाद, दिल्ली, मुंबई आदी शहरांतून सुका मेवा मागवला जातो. ईदच्या दिवशी शिरखुर्मा बनवण्यासाठी प्रत्येक मुस्लिम परिवारात सुक्या मेव्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. प्रत्येक जण आपापल्या परीने सुका मेवा खरेदी करतो. मात्र यंदा भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
असे आहेत सुक्या मेव्याचे भाव
काजू- 600 ते 700 रुपये किलो
बदाम- 700 रुपये
किसमिस- 250 रुपये
खोबरे-175-180 रुपये
खजूर- 70-100 रुपये
चारोळी- 800-900 रुपये
पिस्ता- 1500 रुपये
शेवया-230 रुपये (हाताने तयार केलेल्या)
शेवया- 75-100 रुपये (मशीनवर बनवलेल्या)
काजूचे भाव वाढले
महागाईमुळे सर्वच खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. सुक्या मेव्यात यंदा खोबरे आणि काजूचे भाव सर्वाधिक वाढले आहेत. असे असूनही खरेदीसाठी येणा-या नागरिकांची संख्या कमी झालेली नाही. बाहेरच्या राज्यांतूनही आम्ही सुका मेवा खरेदी करतो.
अब्दुल रहीम खान, डायमंड किराणा