आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Office Peon Threat Two People In Aurangabad

कर विभागाच्या शिपायांकडून मुलाच्या अपहरणाची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मालमत्ता कर कमी करून देतो म्हणून 30 हजार रुपये उकळले व खोटी नोटीस दिली. याविषयी विचारणा केली असता जिवे मारण्याची, मुलाचे अपहरण करण्याची धमकी कर आकारणी विभागातील दोन शिपायांनी दिल्याची तक्रार एका नागरिकाने केली असून यासंदर्भात पोलिसांकडेही त्यांनी धाव घेतली आहे.

सिडकोतील एन-9 भागात असलेल्या रायगडनगरातील रहिवासी अरविंद पाटील यांनी ही खळबळजनक तक्रार केली आहे. मनपाच्या कर आकारणी विभागात सुरू असलेल्या कारभारावर प्रकाशझोत टाकणारा हा प्रकार आहे. लाच प्रकरणामुळे हा विभाग आधीच चर्चेत आला असून आयुक्तांच्याही रडारवर तो आला आहे. त्यांनी नुकतीच 11 जणांची या विभागातून तडकाफडकी बदलीही केली आहे. मात्र हे पुरेसे नसल्याचे सांगणारे हे प्रकरण आहे.

अरविंद पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व शिवसेनेचे सभागृहनेते सुशील खेडकर यांना दिलेल्या निवेदनात हा प्रकार कथन केला आहे. रायगडनगरात 1997 पासून अरविंद पाटील राहतात. भोईवाडा भागातील कैलास तोटे यांच्यामार्फत कर आकारणी विभागातील शिपाई शेख रज्जाक शेख फजल आणि किशोर जाधव या दोन शिपायांनी संपर्क साधला. तुमच्या घराला 1997 पासून 80 हजार रुपयांचा कर लागतो. वर्षाला सात हजार रुपये कर बसतो, असे सांगत तो कमी करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी कैलास तोटे यांच्यासमक्ष या दोघा शिपायांनी तीस हजार रुपये रोख घेऊन गेले. त्यानंतर नवजीवन कॉलनी सिडको, रायगड कॉलनी आर 26 एन-9 अशा पत्त्याची नोटीस दिली. हे घर पद्माकर विठ्ठलराव ठाकूर यांच्या नावाने आहे. ही खोटी नोटीस व मालमत्ता कर आकारणीची खास नोटीस अशा स्वरूपाची 1210 रुपये कर आकारणीची नोटीस दिली. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता शेख रज्जाक व किशोर जाधव यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तुमचे घर जाळून टाकू, खोटा गुन्हा दाखल करू, कार्यालयात जाणे मुश्कील करू आणि शेवटी कहर म्हणजे तुमच्या मुलाचे अपहरण करू, अशा धमक्या देणे सुरू केले.

या सर्व प्रकाराने हादरलेल्या अरविंद पाटील यांनी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व सभागृहनेता सुशील खेडकर यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तांनादेखील हे निवेदन दिले.

हा खंडणीचाच प्रकार
ही सरळ सरळ खंडणीचीच घटना असून असे प्रकार शहरात इतरत्रही घडत असणार हे स्पष्ट आहे. अशा प्रकारची तक्रार घेऊन मनपात येणारे पाटील हे पहिले नागरिक आहेत. नागरिकांनी पुढे येऊन असे काही प्रकार झाले असतील तर तक्रार करावी. कर आकारणी विभागाची प्रतिमा डागाळली असून प्रमुखांचे या प्रकारांकडे दुर्लक्ष असल्यानेच असे प्रकार वाढत आहेत. आयुक्तांनी केवळ छोट्या माशांवर कारवाई न करता मोठय़ा माशांवर कारवाई करणे गरजेचे आहे. - सुशील खेडकर, सभागृह नेता