आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increase Birthrate Of Girls, Latest News In Divya Marathi

मुलींच्या जन्माचे स्वागत करा -सभापती जोधराज लड्डा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विकासाच्या वाटेने जाताना समाजात अनेक चांगले-वाईट बदल घडत असतात. माहेश्वरी समाजाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र, सध्या समाजात मुलींची कमी होणारी संख्या हे चिंतेचे कारण आहे. मुलींच्या जन्माचे सर्वांनी मिळून स्वागत करा. समाज विकासाच्या प्रवाहात पुरुषांइतकेच महिलांचे योगदान आहे, याची जाणीव सर्वांना असायला हवी. तेव्हा मुलींचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी प्रयत्नशील व्हा, असे आवाहन अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे सभापती जोधराज लड्डा यांनी केले.
अग्रसेन भवन येथे शनिवारी (1 मार्च) ‘मंथन 2014’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विचारमंचावर पुष्पा तोष्णीवाल, मनीष मुंदडा, अंजनी मुंदडा, किशोरीलाल धूत, मधुसूदन गांधी, सत्यनारायण लाहोटी, संतोष चरखा, धनश्यामदास रांदड, जवाहर बाहेत आणि वीरेंद्र सोनी यांची उपस्थिती होती.
लड्डा म्हणाले, कार्यकर्तृत्वाने औरंगाबादेतील माहेश्वरी समाजाने संपूर्ण देशात लक्ष वेधले आहे. समाजाच्या विविध उपयोगी योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याने समाजाचा विकास सातत्यपूर्ण होत आहे. समाजाने 19 युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली ही कौतुकास्पद बाब आहे. विधवा, असहाय महिलांची माहिती संकलित करून महासभेकडे पाठवा, त्यांना दरमहा 1000 रुपये रक्कम तसेच इतर मदत केली जाईल. माहेश्वरी सर्वांगीण विकास योजनेतून होतकरूंना मदत करा. शिक्षण, आरोग्य आणि गरिबांचे विवाह या माध्यमातून घडवून आणणे सहज शक्य आहे. समाजाच्या युवकांना प्रशासकीय सेवांसाठी प्रेरित करा, असे आवाहनही लड्डा यांनी केले.
अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न : संतोष चरखा
समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच यामध्ये यश येईल, अशी अपेक्षा आहे. समाजाच्या समस्या जाणून घ्या, गावपातळीवरील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. विविध कार्य करताना सतत अद्ययावत राहा, यातूनच समाजाची प्रगती साधता येणार आहे. विविध सामाजिक योजना, त्यांचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. धनश्यामदास रांदड यांनी प्रास्ताविक केले. शिवनाथ राठी यांची उपस्थिती होती. गायत्री रांदड आणि सीमा लखोटिया यांनी सूत्रसंचालन केले.