आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीपूर्व सवलतीच्या दरातील विक्रीतून राज्याच्या विक्री करात भरघोस वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेतकरी कर्जमाफीमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या राज्य सरकारला विक्री कराच्या वाढीव महसुलामुळे दिलासा मिळाला आहे. देशात एक जुलैपासून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाली. तत्पूर्वी अापल्याकडील वस्तूंचा साठा कमी करण्यासाठी विक्रेत्यांनी विविध गृहोपयोगी वस्तू, वाहने आदींवर भरघोस सवलती जाहीर केल्या. एप्रिल, मे व जून या तिमाहीत या सवलतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या. 

परिणामी या तिमाहीतील विक्री कर महसुलात १५.६ टक्के वाढ झाली. केवळ जून महिन्यातच विक्री करातून मिळणारा महसूल ८१२४ कोटी रुपयांवर पोहोचला. गतवर्षी याच काळात विक्री करातून ६७७० कोटींचा महसूल मिळाला होता. आता विक्री कर जीएसटीमध्ये समाविष्ट झाला आहे. एप्रिल व मेमध्येही विक्री कर महसुलात अनुक्रमे ११.९९ व १५.७९ टक्के वाढ झाली आहे. विक्रीकर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, जूनमधील आकडेवारी आणखी यायची आहे. ती  जुलैअखेरीस प्राप्त होईल. आता जे जूनचे आकडे दिसताहेत ते वास्तविक मेमधील विक्रीचे आहेत. याचाच अर्थ जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या अखेरच्या  दिवसांतील आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. 

का वाढला महसूल
जीएसटी लागू होण्यापूर्वी आपल्याकडील वस्तूंचा साठा संपवण्याच्या दृष्टीने वाहने, गृहोपयोगी टिकाऊ वस्तू, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एफएमसीजी क्षेत्रातील विविध कंपन्या, वितरकांनी भरघोस सवलती जाहीर केल्या. या सवलतींना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परिणामी विक्रीत मोठी  वाढ झाली. त्यातून विक्री कराचा महसूल वाढला.  

औरंगाबादेत वाढीचा कल
राज्यभरात जीेेएसटीपूर्व सवलतींना चांगला प्रतिसाद मिळाला. तसाच कल औरंगाबाद विभागातही दिसून आला. त्याची आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू आहे. वाहने, गृहोपयोगी टिकाऊ वस्तू आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्याच्या सवलतींना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
- दीपा मुधोळ-मुंडे, विक्रीकर सहआयुक्त, (राज्य कर), औरंगाबाद