आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increase The Heart Disease And Respiratory In Children

कार्यशाळेत बालरुग्णांच्या सेवांचे दाखवले प्रात्यक्षिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बालकांमध्ये हृदयरोग आणि श्वसनविषयक आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी तातडीच्या प्रसंगात बालकांना उपचार कसे द्यावेत, याविषयी सप्रात्यक्षिक अनुभव देणारी कार्यशाळा शनिवारी जुलै रोजी शहरात झाली. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियन आणि एमजीएम बालरोग विभाग यांच्या विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरासह विदर्भ, जालना येथील बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. ऋषीकेश ठाकरे, डॉ. मंदार देशपांडे, मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉ. गीता भट्ट, वर्धा येथील डॉ. आकाश बंग आणि डॉ. मनीष वैद्य यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

वैद्यकीय व्यवसाय करताना मृत्यूचा सामना होणे ही अटळ गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीसोबत कुटुंबीयांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यातही बालकात संपूर्ण कुटंुबाचा जीव असतो. त्यामुळे बालकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर मारहाणीचे प्रसंग अधिक प्रमाणात घडतात. यासाठी संवादकौशल्य, सातत्याने बालकांच्या प्रकृतीची माहिती अद्ययावत करणे आणि भावनांना वाट करून देणे महत्त्वाचे असते, याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
श्वसनाच्या आजाराने ७० ते ८० टक्के मृत्यू
बालकांमध्ये श्वसनाचे आजार बळावले आहे. त्यामुळे एकूण दगावणाऱ्या बाळांपैकी ७० ते ८० टक्के मृत्यू हे श्वसनाच्या आजारांमुळे हृदयक्रिया बंद पडल्याने होतात, तर हृदयरोगामुळे दगावणाऱ्या बाळांचे प्रमाण १० टक्के आहे. यासाठी प्रथमोपचारासाठी जवळ कुठलेही उपकरण नसताना ऑक्सिजन कसा द्यावा, बंद पडलेले हृदय कसे सुरू करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मॅनिकिन्सवर प्रशिक्षणही देण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष बाळावर उपचार करत असल्याचा अनुभव डॉक्टरांनी घेतला. बेशुद्धावस्थेत आलेले बाळ किंवा अपघात झालेले बाळ यांच्यावर तत्काळ कोणते उपचार करावेत, कसे करावेत याविषयी इत्थंभूत माहिती देण्यात आली. एमजीएमच्या बालरोगविभागप्रमुख डॉ. अंजली काळे आणि डॉ. केदार सावळेश्वरकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.
ज्ञान मिळाल्याने आत्मविश्वास वाढला
- मुलांवर उपचार करताना हृदय बंद पडल्यास नेमका किती दाब द्यावा, डिफिब्रिलेशन कसे करावे,याबाबत साशंक असतो. आजच्या परिषदेमुळे आम्हाला याचे अचूक ज्ञान मिळाले.
डॉ. राकेश चिकलोंडे, बालरोगतज्ज्ञ
प्रशिक्षण देणार
- बालरोग तज्ज्ञांना अधिकाधिक सक्षम उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात सामान्यांनाही यातील काही प्रशिक्षण देण्याचे आमचे प्रयोजन आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंतचे उपचार देता येतील.
डॉ. मंदार देशपांडे, बालरोगतज्ज्ञ
सखोल मार्गदर्शन
- दंतोपचारां दरम्यान आलेल्या आपत्कालीन स्थितीमध्ये बालकांना कसे उपचार द्यावेत, याविषयीचे सखोल मार्गदर्शन सप्रात्यक्षिक करण्यात आले. अनेकदा आम्हाला तोंडावाटे नळी टाकून उपचार करायचे असतात, पण काही वेळा श्वास अडकू शकतो. तेव्हा नेमके काय करावे, हे आजच्या कार्यशाळेत कळाले.
डॉ. तेजस जयस्वाल, बालदंतरोगतज्ज्ञ