आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाची झोन कार्यालये वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात वाढलेले नवीन १४ वॉर्ड आणि लवकरच साताऱ्याचे वॉर्ड वाढणार असल्याने मनपाच्या झोन कार्यालयांची संख्या वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सहा झोनऐवजी नऊ झोन केले जाणार असून त्यात वॉर्डांचे नव्याने विभाजन केले जाणार आहे. ही रचना करताना नागरिकांना मनपाशी संबंधित कामांसाठी फार दूरवर जाण्याची गरज भासणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
गेल्या महिन्यापर्यंत मनपाचे ९९ वॉर्ड तर सहा झोनमध्ये शहराची विभागणी होती. शहराचा वाढता पसारा पाहता नागरिकांना झोन ऑफिस गाठताना खूप त्रास सहन करावा लागत होता. अनेक भागातील नागरिकांना झोन आॅफिस गाठण्यासाठी सात-आठ किमी जावे लागे. शिवाय एका खेपेत काम होण्याची हमी नसल्याने नागरिकांची फरपट होत होती. आता वॉर्डांची संख्या १४ ने वाढली असून आता सातारा देवळाई परिसर मनपा हद्दीत आला. सध्या जरी तेथे किमान दोन वॉर्ड वाढणार असले तरी आगामी काळात ते आणखी वाढतीलच. हा सगळा विचार करून महापालिका प्रशासन आता या झोन कार्यालयांच्या फेररचनेच्या कामाला लागले आहे.
१० ते १२ वॉर्डांचा झोन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका झोन कार्यालयाकडे १० ते १२ वॉर्डांचे काम दिले जाणार आहे. याआधी सहा झोनमध्ये ९९ वॉर्डांचा कारभार करताना एकेका झोनवर साधारणपणे १६ ते १७ वॉर्डांचा भार असायचा. मनुष्यबळाअभावी नागरी सुविधा पुरवताना या कार्यालयांची तारांबळ उडत असे. आता वाढलेले १४ सातारा देवळाईच्या रूपाने येणारे किमान दोन असे १६ वॉर्ड वाढत आहेत.
सेवांचा दर्जा खालावला
नवीन झोन कार्यालये सुरू करताना मनपाला मनुष्यबळही लागणार आहे. तुटपुंज्या मनुष्यबळात काम कसे सांभाळायचे, हा बिकट प्रश्न आहे. १९९५ नंतर मनपात भरती झाली नाही. सध्याचे मनुष्यबळ आदर्श नियमावलीनुसार लाख लोकसंख्येपुरते असून आहे त्या कर्मचाऱ्यांवर गाडा असल्याने मनपाच्या सेवांचा दर्जाही खालावत आहे.
पुनर्रचना आवश्यकच
महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले की, झोन कार्यालयांची पुनर्रचना करावीच लागणार आहे. नागरी सुविधा पुरवताना प्रशासनावर ताण पडू नये यासाठी नागरिकांनाही सोयीचे राहावे असे झोन निर्माण केले जातील. सध्या सिकंदर अली, हेमंत कोल्हे अफसर सिद्दिकी या अधिकाऱ्यांकडे प्रत्येक झोनची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.