आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारी वाढली की घटली? नोटाबंदीच्या विविध अहवालांमुळे गोंधळ; दर घटल्याचा सीएमआयईचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चलनातून  ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील बेरोजगारी वाढली की घटली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) व सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) यांच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नोटाबंदीनंतर देशात रोजगाराच्या संधीत वाढ झाली आहे. मात्र, विविध प्रसारमाध्यमांतील बातम्यांतून बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे.  यासंदर्भात वेगवेगळ्या वृत्तांमुळे गोंधळ उडाला आहे.
   
सीएमआईचे सीईओ महेश व्यास यांच्या मते, आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या आठवड्यात बेरोजगारीचा दर ७.४ टक्क्यांवरून ६.२ टक्क्यांवर आला, तर २७ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात हा दर आणखी घसरून ५ टक्क्यांच्या खाली आला. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात हा दर वाढून ६.१ टक्क्यांवर आणि १८ डिसेंबर अखेर हा दर ७ टक्क्यांच्या पार गेला. अनेक वेळा पत्रकार आपले मत निश्चित करतात व त्यानुसार सर्वेक्षण करतात, त्यामुळे त्यात अवास्तव आकडेवारीची शक्यता असते. त्यामुळे नोटाबंदीनंतर बेरोजगारी वाढल्याचे व्यास यांनी खंडन केले आहे. उलट काही प्रमाणात रोजगाराच्या संधी वाढल्याने बेरोजगारी घटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
  
सर्व्हे खात्रीशीर : सीएमआयई जानेवारी २०१६ पासून ग्राहकांचा कल आणि बेरोजगारी या संदर्भातील सर्वेक्षण करते. सीएमआयईचे  सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने होतो हे व्यास यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागातील १,६०,००० घरांतून हे सर्वेक्षण केले जाते. दर महिन्याला ४० हजार घरे असे चार महिने सर्वेक्षण केले जाते. त्यामुळे दर महिन्याला ५,२२,००० व्यक्तींच्या (१५ वर्षे व त्यावरील वयाच्या) रोजगार-बेरोजगारीचा सर्व्हे होतो. अशारीतीने जुलैमध्ये ज्या ४० हजार कुटुंबांना प्रश्न विचारण्यात आले त्याच व्यक्तींचा नोव्हेंबरमधील सर्वेक्षणात सहभाग होता. त्यात जुलैमध्ये बेरोजगारी दर ८.५%, तर नोव्हेंबरमध्ये ५.७% आढळला.   

दराचा आलेख सामान्य स्थितीप्रमाणेच 
सीएमआयई ही एक स्वतंत्र संस्था असून याचे सर्वेक्षण जगभरात विश्वासार्ह मानले जाते. व्यास यांच्या मते, खरे तर नोटबंदीनंतर बेरोजगारीत वाढ व्हायला हवी; मात्र अामच्या सर्वेक्षणानुसार बेरोजगारीत घट झाली. हे नेमके कशामुळे घडले याचा शोध आता सुरू आहे. नोटबंदीचा बेरोजगारीवर काहीच परिणाम झालेला नसून हा दराचा आलेख सामान्य स्थितीप्रमाणेच वर-खाली होत आहे.   
 
 
बातम्या आणखी आहेत...