आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागरिकांची परवड: ऐन सणांत सिलिंडरसाठी चार हजार ग्राहक प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एसएमएसद्वारे बुकिंग झाल्यानंतर 24 तासांत सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना शहरातील इंडेनच्या चार हजार ग्राहकांना मात्र त्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. रमजान ईद आणि श्रावण महिन्यात नागरिकांची परवड होत आहे.

दररोज शहरात येणार्‍या 1050 पैकी 400 सिलिंडर मनमाडला पाठवले जात असल्याने अडचण निर्माण झाली असून 15 दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास कंपनी अधिकार्‍यांनी व्यक्त केला. परंतु एक आठवड्यापर्यंत घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने इंडेनच्या गोडाऊनवर ग्राहक गर्दी करत आहेत. अनेक जण पर्यायी व्यवस्थेकडे वळत आहेत. भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम आदी कंपन्यांच्या ग्राहकांना सुरळीत सिलिंडर मिळत आहेत. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळावे म्हणून एजन्सीचालकांनी मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या वाढवली होती. चारच महिने सिलिंडरचा पुरवठा व्यवस्थित झाला. परंतु ऐन सणांमध्ये सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. सिलिंडरसाठी चार हजार ग्राहक प्रतीक्षेत आहेत.

सध्याची स्थिती अशी
इंडेनच्या शहरात तीन एजन्सीज आहेत. त्यांच्याकडे 47 हजार ग्राहकांची नोंद आहे. गजानन महाराज मंदिर परिसरातील विनय एजन्सीत तीन हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. या एजन्सीला दररोज 450 सिलिंडर मिळतात, पण सध्या 200 ते 250 सिलिंडर मिळत आहे. सिडको एन-6 येथील एजन्सीमध्ये दररोज 350 पैकी 300 सिलिंडरचा पुरवठा होत आहे, तर प्रयाग एजन्सीत 500 प्रतीक्षा यादी असून दिवसाआड 306 सिलिंडर मिळत आहेत.

1050 पैकी 400 सिलिंडर मनमाडला पाठवले जातात

गोदामातून आणले सिलिंडर
बुकिंग केल्यानंतर आठ दिवस सिलिंडर मिळाले नाही. त्यामुळे गोदामातून सिलिंडर घ्यावे लागले. रस्त्यावर अनेक खड्डे असल्याने दुचाकीवर सिलिंडर आणण्यासाठी खूप त्रास झाला.
-अजय कुलकर्णी, गारखेडा.

पुरवठा कमी असल्याने प्रतीक्षा
नियमित मिळणारा सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांची प्रतीक्षा यादी वाढली आहे. आठ दिवस थांबावे लागत असल्याने ग्राहक स्वत:हून गोदामावर येत आहेत. लवकरच पुरवठा सुरळीत होणार आहे.
-नारायण खडके, संचालक, विनय इंडेन, गारखेडा.

ग्राहकांनी थेट तक्रार करावी
ग्राहकांना घरपोच सिलिंडर मिळत नसेल तर त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी. सध्या सिलिंडरसाठी प्रतीक्षा यादी आहे. पण लवकरच पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यानंतर ग्राहकांना त्रास होणार नाही.
- अजय यादव, विभागीय पेट्रोलियम अधिकारी, इंडेन गॅस.