आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्ष उमेदवारी भरलेल्यांचे मोबाइल आता स्विच ऑफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांनी माघार घ्यावी यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल आहे. त्यामुळे आतापासूनच अपक्षांना माघार घेण्यासाठी गळ घातली जात आहे. दुसरीकडे दबावतंत्राचा वापर होणार याची कल्पना असल्याने काही अपक्षांनी मंगळवारी दुपारपासूनच मोबाइल बंद ठेवले. त्यामुळे तटस्थांमार्फत बोलणी करण्यात येत आहे.

बंडखोरी शमवण्याचे खरे आव्हान युतीसमोरच आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीमध्ये मातब्बरांनी बंडखोरी केलेली नाही. काही ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून रिंगणात आले असले तरी पक्षनेत्यांना त्याची चिंता नाही. शिवसेनेकडून माजी महापौर गजानन बारवाल, माजी सभागृह नेते सुशील खेडकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, पप्पू व्यास, सोमनाथ बोंबले, तर भाजपकडून दामोदर शिंदे, अनिल मकरिये, कचरू घोडके या अपक्षांना माघार घेण्यास लावण्याचे मोठे आव्हान आहे. यातील पप्पू व्यास यांच्या पत्नीने २०१० मध्ये गुलमंडी वाॅर्डातून बंडखोरी केली होती, तरीही तेथून सेनेच्या प्रीती तोतला विजयी झाल्या होत्या. यंदा हा वाॅर्ड खुला राहिल्याने उमेदवारी मिळावी, अशी त्यांनी मागणी केली. परंतु येथून सचिन खैरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने पप्पू व्यास यांनी पुन्हा मैदानात उडी घेतली. गजानन बारवाल यांना उमेदवारी न दिल्याने ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगितले जाते. गतवेळी त्यांच्या विरोधात बंडखोरी करणारे संजय बारवाल यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज आहेत. शिवाजीनगरात सुशील खेडकर यांच्याऐवजी राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्यांनी उल्कानगरी वाॅर्डातून अर्ज भरला आहे.

माघारीची शक्यता
दामोदर शिंदे हे भाजपमध्ये आले तेव्हाच त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले. परंतु प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीच त्यांचा पत्ता कट केल्याचे समजते. वाॅर्डावर मजबूत पकड असल्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडून येऊ शकतात. त्यामुळे तेही माघार घेण्याची शक्यता नाही.

बंड शमवणार
एकूणच ११ एप्रिलपर्यंत दोन्हीही पक्षांच्या नेत्यांना बंडखोरी शमविण्यासाठी वेगवगेळ्या क्लृप्त्या वापराव्या लागणार हे स्पष्ट आहे. काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरले असल्याने दोन्हीही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. ती कमी करून पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी बंड शमवणे क्रमप्राप्त आहे.
पुढे वाचा... राष्ट्रीय समाज पक्षाचे १७ उमेदवार घोषित