आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Independent Group Of Independent Party In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपक्षांचा स्वतंत्र गट भाजपवर दबाव टाकून पदे घेण्यासाठी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आधी भाजपसोबत जाण्याची घोषणा करणाऱ्या अपक्षांनी अन्य अपक्षांची मदत घेत १४ जणांचा स्वतंत्र गट पालिकेत तयार केला. हा गट भाजपच्या सोयीचा असल्याची चर्चा पहिल्या दिवशी रंगली असली तरी प्रत्यक्षात हा गट स्वतंत्र स्वीकृत सदस्य पदरी पाडून घेण्याबरोबरच स्थायी समितीचे सदस्यत्व तसेच अन्य पदे मिळवण्यासाठी भाजपवर अवलंबून राहता दबाव टाकून पदे घेण्यासाठी आहे. या गटाच्या सदस्यांनी तसे खासगीत बोलताना मान्यही केले आहे.
नवीन गट तयार होत असल्याचे समजल्यानंतर रीतसर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या गजानन बारवाल यांनी आपली टोपी फिरवली. बारवाल यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, नंतर ते पुन्हा अपक्ष झाले आहेत.
बारवाल यांच्याकडे या अपक्षांच्या गटाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने अपक्ष लढून ते पालिकेत पोहोचले. त्यांच्याबरोबरच गुलमंडीवर बंडखोरी करून राजू तनवाणी विजयी झाले. या दोघांनीही आम्ही भाजपसोबतच राहणार, असे विजयानंतर लगेच जाहीर केले होते. त्यानंतर महापौर उपमहापौर निवडणुकीत त्यांनी कोणत्याही अटींशिवाय मतदान केले. त्यामुळे युतीचा एकच गट झाला तर ते त्यांच्यासोबत राहतील किंवा भाजपचा वेगळा गट झाला तर भाजपच्या गटात ही मंडळी जाईल, असे अपेक्षित होते. प्रारंभी तशा हालचालीही सुरू होत्या; परंतु गेल्या सात दिवसांपासून वेगवान घडामोडी सुरू झाल्या.
तनवाणी यांनी अपक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली. बघता बघता १४ अपक्ष त्यांच्याकडे जमाही झाले. १४ जणांना एकत्र येईपर्यंत या गटाचे नेतृत्व तनवाणी हेच करत होते. मात्र, जर तनवाणी यांना अपक्षांचा गटनेता केले तर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची राजकीय अडचण होऊ शकते, याचा अंदाज आल्याने ऐनवेळी गटनेतेपद बारवाल यांच्याकडे देण्यात आले.
अपक्ष म्हणून जिंकल्यानंतर बारवाल यांना शिवसेनेने सन्मानपूर्वक ऑफर दिली होती. मात्र, तिकीट कापल्याचा राग असल्याने मी भाजपसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्याकडे या गटाचे नेतृत्व दिले तर शिवसेनेलाही शह देता येईल, असा होरा यामागे आहे.
आणखी एक तनवाणी नगरसेवक?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपक्षांच्या गटातून माजी आमदार तनवाणी यांचे चिरंजीव बंटी ऊर्फ गोपाल तनवाणीयांना स्वीकृत नगरसेवक करण्यात येणार आहे. तसे झाल्यास एकाच सभागृहात दोन तनवाणी हे नगरसेवक असतील. हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. बंटी यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज केला आहे.
बारवाल म्हणतात, अपक्षांचा नेता; पण मी भाजपचाच
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा अपक्षांचे नेते कसे झालात, असा प्रश्न गजानन बारवाल यांना करण्यात आला असता, मी अपक्षांच्या गटाचा नेता असलो तरी मी भाजपमध्येच आहे. भाजपने ठरवून हा गट तयार केला आहे. त्यामुळे आमचा एक स्वीकृत सदस्य वाढेल तसेच स्थायी समितीतील वाटाही वाढेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. भाजपचा रीतसर सदस्य पक्ष सोडून अन्य गटाचा नेता कसा होऊ शकतो, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.