आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र तेलंगणानंतर रामदास आठवलेंची वेगळ्या विदर्भाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विदर्भावर राज्य शासनाने नेहमीच अन्याय केला आहे. या मागणीला शिवसेनेचा विरोध असला तरी आमचा पाठिंबा आहे. आता स्वतंत्र विदर्भ कराच, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या वतीने राज्यभरात शिबिरे आयोजित केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे शहरात मंगळवारी शिबिर घेण्यात आले. यानिमित्त आठवले शहरात आले होते.

विदर्भावर सरकारने आर्थिक, औद्योगिक अन्यायच केला आहे. विदर्भ स्वतंत्र झाल्यास या भागाचा विकास साधता येईल. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पक्षाच्या वतीने पाच ऑगस्ट रोजी तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेशी आमची राजकीय युती आहे, वैचारिक नाही. त्यामुळे काही मुद्दय़ांवर शिवसेनेला विरोध आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. मोदी पंतप्रधान म्हणून पुढे आले तर तेव्हा आमची भूमिका स्पष्ट केली जाईल. एनडीएने आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राज्यांतील लहान पक्षांना सहभागी करून घेतल्यास केंद्रात सत्ता अटळ आहे. येणार्‍या निवडणुका महायुतीने हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर न लढवता विकासाच्या मुद्दय़ावर लढवल्यास यश मिळेल.

काँग्रेस राजवटीत महागाई, भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणावर बोकाळलेला असून याचा फायदा महायुतीने करून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, बाबूराव कदम, अँड.गौतम भालेराव, पप्पू कागदे, डॉ. कमलाकर कांबळे, गणेश थुलकर, अनिल गोंडाणे, अँड. ब्रrानंद चव्हाण, दौलत खरात, मिलिंद शेळके, अरविंद अवचरमल, संजय ठोकळ, किशोर थोरात, प्रकाश कांबळे, प्रा. सुनील मगरे उपस्थित होते.